गटारातील पाइपगळतीवर भागते तहान
By admin | Published: February 4, 2016 01:56 AM2016-02-04T01:56:28+5:302016-02-04T01:56:28+5:30
पूर्वेकडील गोखीवरे-वालीव परिसरात पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली असून तहान भागवण्यासाठी येथील शेकडो लोक गटारातून जाणाऱ्या पाईपलाईनच्या गळतीमधून येणाऱ्या पाण्यावर अवलंबून आहेत
वसई : पूर्वेकडील गोखीवरे-वालीव परिसरात पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली असून तहान भागवण्यासाठी येथील शेकडो लोक गटारातून जाणाऱ्या पाईपलाईनच्या गळतीमधून येणाऱ्या पाण्यावर अवलंबून आहेत. गटारात उतरून मिळेत तेवढे पाणी भरण्यासाठी याठिकाणी चोवीस तास लोक रांगा लावून उभे असलेले पहावयास मिळते.
नालासोपारा आणि वसईच्या पूर्वेकडे बेकायदा चाळी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या पाण्यासाठी आजही वणवण भटकावे लागत आहे. महापालिकेकडून नळ कनेक्शन मिळत नसल्याने मिळेत तिथून पाणी आणण्यासाठी लोक रस्त्यावरून फिरताना पहावयास मिळतात. गोखीवरे रेंज नाका परिसरात तर गटारातून पाणी भरले जात आहे. याठिकाणाहून नवघर-माणिकपूर शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन जाते. रस्ता रुंदीकरण झाल्याने गटारे नव्याने बांधली गेली आहेत. त्या गटारांमधून ही मुख्य पाईपलाईन जाते. त्यावर आता फुटपाथ बांधण्यात आले आहेत.
फुटपाथवरील मेन होलची झाकणे गायब झाली आहेत. त्या होलमधून लोक गटारात शिरतात. गटारातून जाणारी पाईपलाईन लिकेज असल्याने काही ठिकाणी पाणी गळती असते. ते पाणी घेण्यासाठी लोकांची चोवीस तास रांग लागलेली दिसते. पुरुष, महिला आणि लहान मुले प्लॅस्टिकचे ड्रम आणि हंडे घेऊन पाण्यासाठी रांग लावून उभे असतात. जसा नंबर येईल त्यानुसार घरातील एक व्यक्ती गटारात उतरून आतून पाणी भरुन वर असलेल्या आपल्या माणसाकडे देताना दिसते. ही पाईपलाईन गटारातून जात असून गेल्या काही महिन्यांपासून तिला गळती लागली आहे.
पण, पालिकेकडून तिची दुरुस्ती केली जात नसल्याने लोक येथील पाणी नेत आहे. दुसरीकडे, गटारातच लिकेज असल्याने पाण्यामध्ये गटाराचे दूषित पाणी शिरत असण्याचाही धोका आहे. त्यामुळे हजारो लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्याण झाला आहे. (प्रतिनिधी)