ठाण्यातील वाचक कट्टयावर रंगली काव्य दीपावलीची मैफिल, रसिकांना मिळाला कवितांचा फराळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 04:34 PM2018-11-03T16:34:35+5:302018-11-03T16:37:24+5:30
ठाण्यातील वाचक कट्ट्यावरील प्रेक्षकांना दीपावली निमित्त काव्य मैफिलीतून रसिकांना कवितांचा फराळ मिळाला.
ठाणे : अवघ्या काहीच दिवसांवर दिवाळी आली असून घरोघरी फराळ बनवायला सुरवात झाली आहे. पण हा फराळ जरा वेगळा आहे.या फराळात कविता ऐकण्यास मिळाल्या. वाचक कट्टयावर काव्य दीपावली अर्थात दिवाळीचा काव्यात्मक फराळ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचा हा २२ क्रं चा वाचक कट्टा होता.यावेळी रसिक प्रेक्षकांची गर्दी जमली होती.
यावेळी वाचक कट्ट्याचे प्रमुख किरण नाकती यांनी पूल देशपांडे लिखित "भरलेला खिसा" हि वास्तववादी कविता सादर केली. जीवन जगत असताना आर्थिक निकष कसे महत्वाचे ठरतात, माणसे परिस्तिथीनुसार कशी बदलतात तसेच या सर्वात मैत्री हीच अशी गोष्ट आहे जी शेवटपर्यंत टिकते असे या कवितेत सांगण्यात आले. विं.दा. करंदीकर लिखित "आयुष्याला द्यावे उत्तर" या कवितेतून जीवनाकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन आणि वागण्यातला निर्भीडपणा मांडण्यात आले. "बायको जेव्हा बोलत असते" या कवितेच्या माध्यमातून समस्त पुरुष जातीच्या वेदना विनोदी ढंगाने मांडण्यात आल्या. "कणा" हि कविता यावेळी खास आकर्षण ठरली, आपल्या कढील सर्व काही उध्वस्त झालेले असताना देखील जगण्याची नवी उमेद देणारी कविता म्हणजे कणा होय.अनेक समस्यांना सामोरं जात इथपर्यंतचा आपला खडतर प्रवास नाकती यांनी या कवितेच्या साहाय्याने मांडला. साध्याच्या वास्तवावर प्रखरपणे भाष्य करणारी "लाल रंग" ही स्वलिखित कविता सादर करत माणुसकीच्या बोथट झालेल्या भिंती व माणसांचे बदलते चेहरे यावर भाष्य करण्यात आले.एखाद्या अपघाताच्या वेळी रुग्णाला रक्त देताना आपण जात पाहतो का? मग इतर वेळी का आपण वेगवेगळ्या रंगात विभागले गेलो अहोत? असा प्रश्न या सादरीकरणातून विचारण्यात आला. माणसाला माणूस म्हणून वागणूक दिली तरच एकमेकांतिल अंतर व समाजातील जातीपातीच्या भिंती नष्ट होतील व सर्वधर्म समभाव ही भावना रुजू होईल असे नाकती म्हणाले. यावेळी साधना ठाकूर,गौरी ठाकूर यांनी गुलजार जिच्या कविता सादर केल्या.शुभांगी भालेकर यांनी पाणी व प्राणी,सहदेव कोळंबकर याने असा असावा तो,कुंदन भोसले याने दिवाळीच्या कविता,मौसमी घाणेकर यांनी काव्यांजली,रोशनी उंबरसाडे हीने कालयुग इत्यादी कवीता सादर केल्या. वैभव चव्हाण,रुक्मिणी कदम,महेश झिरपे,वैभव पवार,प्रथमेश मंडलीक, ओमकार मराठे, उत्तम ठाकूर,साक्षी महाडिक,माधुरी कोळी, अच्युत वाकडे यांनी देखील यावेळी विविध विषयांवर कवीता सादर केल्या. कट्ट्याचे निवेदन राजन मयेकर यांनी केले. दीपप्रज्वलन जेष्ठ प्रेक्षक वाकडे यांनी केले.