मुख्यमंत्र्यांची बदनामी, अजय जया तुरुंगात; नौपाडा पोलिसांनी केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 02:58 AM2023-05-31T02:58:12+5:302023-05-31T02:58:33+5:30
अजय जया यांना अटक केल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी मंगळवारी दिली.
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची बदनामी केल्याप्रकरणी तसेच समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी धर्मराज्य पक्षाचे ठाणे शहर संघटक अजय जया यांना अटक केल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी मंगळवारी दिली. त्यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले.
ठाण्यातील ‘प्रशांत कॉर्नर’ या मिठाईच्या दुकानावर ठाणे महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने २५ मे रोजी कारवाई केली हाेती. या कारवाईचा संबंध एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली शिंदे यांच्याशी जोडून शिंदे कुटुंबीयांची बदनामी करण्याचे षडयंत्र अजय जया यांनी रचल्याची तक्रार नौपाडा पोलिस ठाण्यात २८ मे २०२३ रोजी दाखल झाली होती.
नौपाडा पोलिस ठाण्यात कलम १२० - ब नुसार कटकारस्थान रचणे, सोशल मीडियाद्वारे दुकानात वाद झाल्याची अफवा पसरविल्याने कलम ५०५ (२) नुसार तेढ निर्माण करणे आणि कलम ५०० नुसार बदनामी केल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल झाला होता. याच प्रकरणात पोलिस निरीक्षक आनंद निकम यांच्या पथकाने मंगळवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जया यांना अटक केली. ठाणे न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिल्यामुळे त्यांची रवानगी ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात हाेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.