घराणेशाहीचा पराभव; एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका; लोकशाहीचा विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 02:05 PM2024-01-12T14:05:27+5:302024-01-12T14:06:11+5:30
"हीच बाळासाहेबांच्या विचारांची आणि कार्यकर्त्यांची शिवसेना असल्यावरही शिक्कामोर्तब"
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: लोकशाहीमध्ये मेरिटला महत्त्व असते. लोकसभेत, विधानसभेत आणि पक्ष संघटना बांधणीतही आमचे बहुमत असल्याचे स्पष्ट झाल्यानेच अध्यक्षांनी दिलेला निकाल हा लोकशाहीचा विजय असून घराणेशाहीचा पराभव असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. तसेच खरी शिवसेना ही आमचीच असल्याचे स्पष्ट झाले असून हीच बाळासाहेबांच्या विचारांची आणि कार्यकर्त्यांची शिवसेना असल्यावरही शिक्कामोर्तब झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना कुणाची याबाबत दिलेल्या निकालानंतर गुरुवारी ठाण्यातील आनंद आश्रम येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांनी जल्लोष केला. यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्धव ठाकरे यांच्यावर शिंदे यांनी तोफ डागली. शिंदे म्हणाले की, निकालामुळे आमच्याकडे बहुमत असल्याचे सिद्ध झाले असून विरोधकांना चपराक बसली आहे. आता पक्ष चालविताना मी पक्षाचा मालक असल्याची मनमानी कोणालाही करता येणार नाही. लोकशाहीत निवडणूक एकाबरोबर लढवायची आणि निवडणुकीनंतर दुसऱ्याबरोबर केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी सरकार स्थापन करायचे, असे करता येणार नाही.
काँग्रेसला डोक्यावर बसवले
बाळासाहेबांनी काँग्रेसला नेहमी विरोध केला. मात्र, त्यांनी काँग्रेसला डोक्यावर बसवले, त्यांच्याबरोबर सत्तेत सहभागी झाले. बाळासाहेबांचे विचार केवळ एका खुर्चीसाठी सोडले त्यांना हा निकाल ही मोठी चपराक असल्याचेही शिंदे म्हणाले. आम्ही बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या विचाराचे सरकार स्थापन केले आहे.
विरोधी आमदारांच्या अपात्रेबाबत कायदेतज्ज्ञांबरोबर चर्चा करणार
भरत गोगवले आमचे प्रतोद असून ते वैध असल्यावर शिक्कामोर्तब झाले. ठाकरे गटाकडे संघटनात्मक बहुमत आहे, अशा प्रकारचा कोणताही पुरावे ते देऊ शकले नाहीत. ठाकरे गटाचे आमदार अपात्र करावे ही याचिका गोगावले यांनी अध्यक्षांकडे केली होती. मात्र, ती का फेटाळण्यात आली याची कारणे आम्हाला माहीत नाहीत. विरोधी आमदारांच्या अपात्रेबाबत आम्ही कायदेतज्ज्ञांबरोबर चर्चा करून पुढील निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्वत:च्या स्वार्थासाठी घटनाच पायदळी तुडवली
बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात पक्षाचा कारभार घटनेनुसार चालत होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी मनमानी कारभार करून स्वत:च्या स्वार्थासाठी घटनाच पायदळी तुडवली, असा आरोपही मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मागितले होते. मात्र, त्यांनी स्वत:चे नाव दिले, त्यावरुन त्यांनी टोला लगावला.