पप्पु कलानी यांची कारवाई टाळण्यासाठी दलबदलूपणा - आमदार कुमार आयलानी
By सदानंद नाईक | Published: April 23, 2024 05:31 PM2024-04-23T17:31:44+5:302024-04-23T17:33:34+5:30
उल्हासनगरात पप्पु कलानी हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या सुनबाई पंचम कलानी ह्या शरद पवार गटाच्या शहरजिल्हाध्यक्ष आहेत.
उल्हासनगर : गंभीर गुन्हे दाखल असलेले माजी आमदार पप्पु कलानी व ओमी कलानी हे कारवाई टाळण्यासाठी दलबदलूपणा करीत असल्याचा आरोप आमदार कुमार आयलानी यांनी केला. याप्रकाराने आयलानी व कलानी ऐन लोकसभा निवडणुकी दरम्यान उभे ठाकणार असून शहरात कलानी नाणे चालत असल्याचे उत्तर कुमार आयलानी याना ओमी कलानी यांनी दिले.
उल्हासनगरात पप्पु कलानी हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या सुनबाई पंचम कलानी ह्या शरद पवार गटाच्या शहरजिल्हाध्यक्ष आहेत. तर दुसरीकडे ओमी टीमचे प्रमुख ओमी कलानी यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा दिला. महायुतीचे संभाव्य उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी कलानी महलाची वारी केली आहे. कलानी यांच्या पाठिंब्याचे स्वागत करण्या ऐवजी आमदार कुमार आयलानी हे कलानी कुटुंबावर आरोप करीत सुटले. माजी आमदार पप्पु कलानी व ओमी कलानी यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असून भविष्यातील कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी कलानी दलबदलूपणा करीत असून त्यांची शहरात ७ हजार मता पेक्षा जास्त ताकद नसल्याचे आयलानी यांनी म्हटले आहे. आमदार कुमार आयलानी यांच्या कलानी पितापुत्रावरील आरोपामुळे ऐन निवडणुकीत कलानी-आयलानी आमने-सामने आले.
लोकसभेनंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून आमदार कुमार आयलानी मुख्य दावेदार आहेत. अश्या वेळी कलानी यांनी भाजपात एन्ट्री केल्यास, कलानी कुटुंबाचा विधानसभा उमेदवारिसाठी विचार होऊ शकतो. अशी भीती कुमार आयलानी यांना असल्याचे बोलले जाते. युवानेते ओमी कलानी यांनी शहरात फक्त कलानी नाणे खणखणीत असून आम्ही कोणत्याही पक्षाशी बांधील नसल्याची प्रतिक्रिया दिली. ओमी कलानी यांनी ओमी टीमची स्थापना गेल्या महापालिका निवडणुकीपूर्वी करून भाजपा सोबत युती केली होती. ओमी कलानी यांच्यामुळे महापालिकेत भाजपचा महापौर निवडून आला होता. मात्र विधानसभेचा शब्द फिरून उमेदवारी कलानी कुटुंबा ऐवजी कुमार आयलानी यांना दिली. महापालिका महापौर निवडणुकीत ओमी कलानी यांनीं भाजपचा वचपा काढल्याने, महापौर पद शिवसेनेकडे गेले. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षात रीतसर प्रवेश केला. तर गेल्या महिन्यात शरद पवार यांच्यासह जितेंद्र आव्हाड आदी नेत्यांनी कलानी महल गाठल्याने, कलानी राष्ट्रवादीमय झाल्याचे बोलले जाते.