तुटलेला हात जोडण्याची शस्त्रक्रिया अयशस्वी, पदाधिका-यांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2017 10:17 PM2017-10-13T22:17:19+5:302017-10-13T22:17:31+5:30
घोडबंदर रोडवरील एका इमारतीच्या लिफ्टमध्ये हात अडकून तो तुटलेल्या अर्चना थळे या आठ वर्षीय मुलीवर मुंबईच्या केईएम रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली
ठाणे: घोडबंदर रोडवरील एका इमारतीच्या लिफ्टमध्ये हात अडकून तो तुटलेल्या अर्चना थळे या आठ वर्षीय मुलीवर मुंबईच्या केईएम रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र ती यशस्वी झाली नसल्याचे तिच्यावर उपचार करणाºया डॉक्टरांनी सांगितले. अर्चनाची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली. याप्रकरणी सोसायटीच्या पदाधिका-यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असला तरी कोणालाही अटक केलेली नाही.
कासारवडवलीतील बोरींडापाडा येथे वास्तव्याला असलेली ही मुलगी ‘उन्नती ग्रीन’ या इमारतीमध्ये तिस-या मजल्यावर शिकवणीला जात होती. तीन दिवसांपूर्वी ती शिकवणीसाठी दुपारच्या वेळी गेली. त्यावेळी तळमजल्यावर पडलेले आपले पेन घेण्यासाठी ती लिफ्टने खाली आली. लिफ्टमधून बाहेर पडताना तिची चप्पल लिफ्टमध्येच राहिली. चप्पल काढण्याच्या प्रयत्नात अर्चना असतांनाच लिफ्ट अचानक सुरु झाली. लिफ्टच्या दरवाजात तिचा डावा हात अडकला. तो कोपरापासून तुटल्याने तिला तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तिची प्रकृती आता धोक्याबाहेर असली तरी हात जोडण्यासाठी तिच्यावर केलेली शस्त्रक्रिया मात्र अयशस्वी ठरली. दरम्यान, याप्रकरणी सोसायटीचे अध्यक्ष, सेक्रेटरी आणि खजिनदार या पदाधिका-यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून ८ ते १० जणांचे जबाब नोंदवल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक ढोले यांनी सांगितले. पदाधिका-यांबरोबर, मुलीचीही काही अंशी चूक असून ग्रीलचा दरवाजा या घटनेला कारणीभूत असल्याचे एका अधिका-याने सांगितले.