काळाबाजार थांबवणाऱ्या बायोमेट्रीकला विलंब
By admin | Published: October 26, 2015 12:50 AM2015-10-26T00:50:08+5:302015-10-26T00:50:08+5:30
शिधावाटप (रेशनिंग) दुकानांवरील धान्य, रॉकेल, साखरेसह अन्नधान्याचा काळाबाजार थांबवण्यासाठी ‘बायोमेट्रीक सिस्टीम’ची तयारी पूर्ण झाली आहे.
सुरेश लोखंडे, ठाणे
शिधावाटप (रेशनिंग) दुकानांवरील धान्य, रॉकेल, साखरेसह अन्नधान्याचा काळाबाजार थांबवण्यासाठी ‘बायोमेट्रीक सिस्टीम’ची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र, त्याच्या अंमलबजावणीस विलंब होत असल्यामुळे ग्राहकांमध्ये तर्कवितर्क काढले जात आहेत.
यासाठी दोन टप्प्यांमध्ये कामाचे नियोजन करण्यात आले. पहिल्या टप्प्यात सगळ्या शिधापत्रिकांची संगणकीय नोंद करण्यात आली. भारत सरकारचा खाद्य निगम विभाग ते तालुकास्तरावर होणाऱ्या धान्यवाहतुकीचे संगणकीकरण, पुरवठा विभागाच्या विविध कार्यालयांचे संगणकीकरण झाल्याचे सांगितले जात आहे. तर, दुसऱ्या टप्प्यात एफपीएस अॅटोमेशन म्हणजे प्रत्येक शिधावाटप दुकानावर बायोमेट्रीक यंत्र बसवणे अपेक्षित आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुमारे ५५४ शिधावाटप धान्य दुकाने आहेत. त्यावरील सुमारे एक लाख ९५ हजार कार्डधारकांच्या शिधापत्रिका तपासण्याचे काम पूर्ण झाले आहे.
महापालिका क्षेत्रात सर्वाधिक रेशनिंग दुकाने असून त्यांच्या कार्यक्षेत्रातील ग्राहकांचीदेखील सर्व प्रकारची तपासणी, नोंदणी आधीच पार पडली आहे. यामध्ये विशेषत: आधारकार्ड, बँक खाते क्रमांक, मोबाइल नंबर यांचीही नोंद झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईमुळे गोरगरीब भरडले जात आहेत. यावर पर्याय म्हणून रेशनिंग दुकानांत जावे तर तेथे नेहमीप्रमाणे कोटा आला नसल्याचे उत्तर त्याला मिळते. त्यामुळे कार्डधारक मोठ्या विवंचनेत सापडले आहेत. बायोमेट्रीक लागू झाले असते तर त्याचे धान्य त्यास महिनाभरात कधीही घेता आले असते. यामुळेच बायोमेट्रीक सिस्टीम लागू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. स्वस्त धान्य दुकानांवर केंद्र तसेच राज्य शासनाव्दारे शिधापत्रिकाधारकांना जीवनावश्यक अन्नधान्य, खाद्यतेल, रॉकेल, गहू, तांदूळ, साखर स्वस्तात मिळणे अपेक्षित आहे. डाळीचे भाव वाढल्यामुळे गोरगरिबांच्या तोंडचा डाळभातही हिरावला गेला. यावर, मात करण्यासाठी रेशनवर सवलतीच्या दराने कार्डधारकांना डाळी मिळण्यासाठी उपाय करण्याची गरज आहे.