‘ई-तिकीट’च्या निविदेला विलंब

By admin | Published: May 6, 2017 05:39 AM2017-05-06T05:39:21+5:302017-05-06T05:39:21+5:30

लाखो रुपये बिलांच्या थकबाकीप्रकरणी ‘ट्रायमॅक्स’ कंपनीने सेवा देताना टाळाटाळ करण्यास सुरुवात केल्याने केडीएमटी

Delay in e-ticket submission | ‘ई-तिकीट’च्या निविदेला विलंब

‘ई-तिकीट’च्या निविदेला विलंब

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : लाखो रुपये बिलांच्या थकबाकीप्रकरणी ‘ट्रायमॅक्स’ कंपनीने सेवा देताना टाळाटाळ करण्यास सुरुवात केल्याने केडीएमटीच्या ई-तिकीट प्रणालीला खीळ बसली आहे. त्यामुळे जुन्या पेपर-तिकीट प्रणालीचा आधार घेण्याची नामुश्की केडीएमटी उपक्रमावर ओढवली आहे. मात्र, नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ‘ट्रायमॅक्स’ला मुदतवाढ देण्याचा निर्णय केडीएमटीने घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव शनिवारच्या परिवहन समितीच्या सभेपुढे ठेवणार असून सदस्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
केडीएमटीत २०१२ पासून ई-तिकीट प्रणाली लागू करण्यात आली आहे. मे. ट्रायमॅक्स आयटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला याचे पाच वर्षांसाठी कंत्राट दिले आहे. त्याची मुदत शनिवार, ६ मे रोजी संपत आहे. परंतु, सध्या लाखोंच्या थकीत बिलांमुळे कंत्राटदार सेवा देण्यास टाळाटाळ करत आहे. परिणामी, या ई-सेवेला खीळ बसली आहे. कंपनीकडून ई-तिकिटासाठी लागणारा पेपर रोल आणि पुरेशी यंत्रे उपलब्ध करून दिली जात नाहीत. त्यातच नादुरुस्त यंत्रे दुरुस्त करण्यासाठी तंत्रज्ञही उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे सध्या प्रवाशांना पेपर-तिकीट द्यावे लागत आहे. त्यामुळे केडीएमटीने नवीन कंत्राटदार नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्यंतरी नवीन निविदा प्रक्रिया पार पडेपर्यंत या कंत्राटदाराला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यासंदर्भातील प्रस्ताव परिवहन समितीच्या सभेत उपक्रमाने आणला होता. परंतु, समितीने कंत्राटदाराच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत तो स्थगित ठेवला. आता मुदतवाढीचा प्रस्ताव आणला आहे. यामुळे आता सदस्य हा प्रस्ताव मान्य करतात की धुडकावतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सभांचा सपाटा : परिवहन समिती स्थापन झाल्यानंतरची पहिली सभा शनिवारी होत आहे. ही सभा दुपारी ४ वाजता आहे. तत्पूर्वी सकाळी ११.३० वाजता शिक्षण समिती तर स्थायी समितीची सभा दुपारी अडीच वाजता होणार आहेत. भिवंडी पालिकेच्या निवडणुकीच्या कामामुळे केडीएमसीतील सचिवांसह अन्य अधिकारी व्यस्त असल्याने दिवसभरात सलग तीन सभा घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे.


‘तेजस्विनी’चा प्रस्ताव पटलावर

केडीएमटीने महिलांसाठी ‘तेजस्विनी’ ही विशेष बससेवा सुरू करण्याचा प्रस्तावही समितीच्या सभेत ठेवला आहे. सकाळी कामावर जाताना आणि सायंकाळी घरी परतताना महिलांची गैरसोय होऊ नये, यासाठी सरकारने त्यांच्यासाठी ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. या बसमुळे महिलांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
केडीएमटीच्या ताफ्यात तेजस्विनीच्या चार बस येणार आहेत. त्यातील कल्याणसाठी आणि डोंबिवलीसाठी प्रत्येकी दोन उपलब्ध करून दिल्या जातील. या बस सकाळी आणि सायंकाळी महिला विशेष लोकलला जोडून चालवल्या जातील.
या बसखरेदीसाठी भांडवली खर्च म्हणून सरकारकडून केडीएमसीला १ कोटी २० लाख मंजूर झाले आहे. त्या बसखरेदीसाठी निविदा काढण्यात येणार आहे. परिवहन आणि महासभेच्या मान्यतेने धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे.
च्यासंदर्भात शनिवारच्या सभेत प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. बसखरेदी करण्यासाठी वित्तीय आणि प्रशासकीय मंजुरी देऊन महासभेला शिफारस करणे, असा हा प्रस्ताव आहे.

Web Title: Delay in e-ticket submission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.