कचरा उचलण्यात पालिकेकडून दिरंगाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:28 AM2021-06-18T04:28:15+5:302021-06-18T04:28:15+5:30
बदलापूर : कोरोनाची लाट ओसरल्यानंतर पालिका प्रशासनाने शहरातील स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे असताना अद्यापही पालिका प्रशासन त्याबाबत गंभीर नसल्याची ...
बदलापूर : कोरोनाची लाट ओसरल्यानंतर पालिका प्रशासनाने शहरातील स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे असताना अद्यापही पालिका प्रशासन त्याबाबत गंभीर नसल्याची बाब उघड झाली आहे. शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. दोन ते तीन दिवस कचरा उचलला जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
कुळगाव बदलापूर नगरपालिकेने शहरातील कचरा उचलण्यासाठी घंटागाडी सुरू केली आहे. मात्र शहरातील अनेक घंटागाड्या या केवळ सोसायट्यांमधील कचरा उचलत आहेत, तर दुसरीकडे रस्त्याच्या कडेला साचलेला कचरा उचलण्याचे तात्पर्य घंटागाडीवाले दाखवत नसल्याची बाब उघड झाली आहे. सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना या कचऱ्याचा त्रास होतो. काही ठिकाणी तर पावसामुळे कचऱ्याच्या ठिकाणी चिखल झाला आहे. या कचऱ्यामुळे रात्रीच्या वेळी भटक्या कुत्र्यांचा वावरही वाढतो. ऐन पावसाळ्यात पालिकेचे या कचऱ्याकडे दुर्लक्ष होत असेल तर शहरात साथीचे रोग पसरायला वेळ लागणार नाही. पालिकेने साचलेल्या कचऱ्याकडे कानाडोळा न करता हा कचरा नियमित उचलावा, अशी मागणी आता बदलापूरकरांकडून होत आहे.