महापालिका शाळांच्या दुरूस्ती कामात दिरंगाई, कार्यकारी अभियंत्यावर होणार कारवाई!
By अजित मांडके | Published: August 25, 2023 05:18 PM2023-08-25T17:18:45+5:302023-08-25T17:19:38+5:30
ठाणे महानगरपालिका क्षेत्रामधील ज्या शाळांची दुरूस्ती आवश्यक आहे, अशा एकूण ३४ शाळा दुरूस्तीच्या कमांची रक्कम १५ कोटी असून त्यासाठीचा कार्यादेशही ८ मार्च २०२३ रोजी देण्यात आला आहे.
ठाणे : महापालिकेच्या नादुरूस्त शाळा सुस्थितीत असाव्यात याकामी इमारत दुरूस्ती अंतर्गत १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. शाळा दुरूस्तीच्या कामाचा कार्यादेश निघाल्यानंतर इमारतींच्या दुरूस्तीचे काम हाती घेवून ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले होते. त्यानुसार काही शाळांची कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत, ज्या शाळांची कामे अद्याप सुरू झालेली नाहीत किंवा काही शाळांची कामे धीम्या गतीने सुरू आहेत अशा संबंधित कार्यकारी अभियंत्यांना यांनी नोटीस बजावण्यात आल्या असून विहित मुदतीत नोटीसाचा खुलासा न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रामधील ज्या शाळांची दुरूस्ती आवश्यक आहे, अशा एकूण ३४ शाळा दुरूस्तीच्या कमांची रक्कम १५ कोटी असून त्यासाठीचा कार्यादेशही ८ मार्च २०२३ रोजी देण्यात आला आहे. या निविदेमध्ये प्रत्येक प्रभाग समिती हद्दीतील शाळांच्या दुरूस्तीचा अंतर्भाव करण्यात आला असून त्यापैकी फक्त ५ शाळांच्या दुरूस्तीचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. तर ९ शाळांच्या दुरूस्तीचे काम ५० टक्क्यापेक्षा जास्त झाले असून ती कामे प्रगतीपथावर आहे. मात्र ८ शाळांच्या दुरूस्तीचे काम संथगतीने सुरू असून सदरची कामे अत्यंत असमाधानकारक आहेत. तर १२ शाळांच्या दुरूस्तीच्या कामाची सुरूवात झालेली नाही.
काम सुरू न झालेल्या शाळा
कळवा विभागातील शाळा क्र. ४,६,७२,६८, माजिवडा मानपाडा विभागातील शाळा क्र. ५९,५२,१२८, मुंब्रा विभागातील शाळा क्र. ७८,१२३,११३,७७,१२४,११६, दिवा विभागातील शाळा क्र. ८५,९०,९१ तर नौपाडा विभागातील शाळा क्र.१६ या शाळांच्या कामांना अद्याप सुरूवात झालेली नाही. या शाळांच्या कामाची जबाबदारी सोपविलेल्या कार्यकारी अभियंत्यांना नोटीस बजावण्यात आली असून अपूर्ण असलेल्या कामांबाबतचा लेखी खुलासा मागविण्यात आला आहे. तसेच विहित मुदतीत खुलासा सादर न केल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल असेही नोटीशीत नमूद करण्यात आले आहे.