सेवानिवृत्तीचा मोबदला देण्यास होतोय विलंब, आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 03:53 AM2017-11-06T03:53:48+5:302017-11-06T03:53:54+5:30
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत काम करणा-या मैल कामगारांना मे महिन्यात सेवानिवृत्त करण्यात आले. मात्र, त्यांना
ठाणे : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत काम करणा-या मैल कामगारांना मे महिन्यात सेवानिवृत्त करण्यात आले. मात्र, त्यांना अद्यापही सेवानिवृत्तीनंतरची रक्कम जिल्हा परिषदेकडून मिळाली नसल्याचा आरोप करून त्याविरोधात बेमुदत धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा परिषद कामगार युनियनद्वारे देण्यात आला आहे.
मुरबाड तालुक्यातील शांताराम गोळे, बारकू बसमा, घारू ठोमरा, दौलत भागरत, केशव देशमुख आदी पाच मैलकुली कामगार सुमारे सहा महिन्यांपासून सेवानिवृत्त झाले आहेत. यानंतर, त्यांना मिळणारी रक्कम अद्यापही जिल्हा परिषदेकडून मिळाली नसून निवृत्तीवेतनही त्यांना लागू केले नाही. यामुळे या कर्मचाºयांची उपासमार होत आहे. या चतुर्थश्रेणी कर्मचाºयांना सेवारकमेसह गटविमा योजना, थकबाकी रक्कम आदी व निवृत्तीवेतन मिळणे अपेक्षित होते. यामुळे या कर्मचाºयांसाठी जि.प. कामगार युनियन बेमुदत उपोषण छेडण्याच्या तयारीत आहे.
‘झीरो पेंडन्सी अॅण्ड डेली डिस्पोजल’ या पद्धतीचा उपक्रम जिल्हा परिषदेकडून युद्धपातळीवर राबवला जात आहे. मात्र, त्यातही या कर्मचाºयांना अद्याप न्याय मिळालेला नाही. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम अधिकाºयांसह कर्मचारी जोरदारपणे राबवत आहेत. १० नोव्हेंबरपर्यंत सुरू असलेल्या या उपक्रमात या कर्मचाºयांच्या फायलींचा विचार जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने करणे अपेक्षित आहे. अन्यथा, झीरो पेंडन्सी व दक्षता शपथ निष्फळ होण्याची दाट शक्यता आहे.