रस्त्यावरील अतिक्रमण हटवा; ‘यू’ टाइप रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 01:10 AM2020-02-08T01:10:51+5:302020-02-08T01:11:14+5:30

सेनेसह सामाजिक संघटनांचे उपोषण

Delete road encroachment; U 'type road mismatch | रस्त्यावरील अतिक्रमण हटवा; ‘यू’ टाइप रस्त्याची दुरवस्था

रस्त्यावरील अतिक्रमण हटवा; ‘यू’ टाइप रस्त्याची दुरवस्था

Next

कल्याण : पूर्वेतील ‘यू’ टाइप रस्ता व पदपथांवर फेरीवाल्यांनी केलेल्या अतिक्रमणाच्या निषेधार्थ शिवसेनेचे पदाधिकारी आणि सामाजिक संघटनांनी शुक्रवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. रिक्षा संघटनांनीही या आंदोलनात सहभागी होत रिक्षाबंदची हाक दिल्याने ‘यू’ टाइप रस्त्यावरील सर्व रिक्षास्टॅण्ड बंद ठेवण्यात आले. परिणामी, प्रवाशांची गैरसोय झाली. दरम्यान, सायंकाळी उशिरा केडीएमसीकडून कारवाईबाबत लेखी आश्वासन मिळाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

‘यू’ टाइप हा रस्ता काटेमानिवली चौक ते गणपती मंदिर रोड, छोटा बोगदा ते सिद्धार्थनगर, म्हसोबा चौक ते तिसगाव रोड, तिसगावनाक्यापर्यंत आहे. परंतु, सध्या या रस्त्याची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. या रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण झालेले नसतानाही फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढलेले आहे. तसेच रस्त्यालगतचे पदपथही टपरीधारक आणि फेरीवाल्यांनी व्यापले आहेत. ‘यू’ टाइप रस्त्यातील गणपती मंदिर हटविले. परंतु, त्या मोकळ्या झालेल्या जागेवरही फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणाला महापालिका अधिकाऱ्यांचे अभय असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.

आंदोलनात शिवसेनेचे कल्याण पूर्व विधानसभा सहसंपर्कप्रमुख शरद पाटील, पूर्वेतील सेनेचे सर्व पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी, राष्ट्र कल्याण पार्टी, रिक्षा-चालक-मालक संघटना, शिव वाहतूकसेना, महाराष्ट्र रिक्षाचालक सेना, सहयोग सामाजिक संस्था आदींनी सहभाग घेतला आहे. रिक्षा-चालक-मालक असोसिएशनचे अध्यक्ष व केडीएमसीचे सभागृहनेते प्रकाश पेणकर यांनीही उपस्थिती लावली होती. या आंदोलनानंतर तरी अतिक्रमणांवर कारवाई केली जाते का याकडे लक्ष लागले आहे.

लेखी आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे

आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी फेरीवाला अतिक्रमणविरोधी विभागाचे उपायुक्त लक्ष्मण पाटील, सुहास गुप्ते आणि वसंत भोंगाडे हे अधिकारी आले होते. परंतु, सुरुवातीला चर्चा निष्फळ ठरली. केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांच्याशी चर्चा झाल्याशिवाय व अतिक्रमण हटविण्यासंदर्भात ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला.

दरम्यान, एकीकडे उपोषण सुरू असताना ‘जे’ प्रभागातर्फे पदपथावरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. परंतु, ठोस कृती कार्यक्रम द्या, या मागणीवर उपोषणकर्ते ठाम राहिले. सायंकाळी उशिरा उपायुक्त पाटील यांनी कारवाईची ठोस वेळ ठरवली असून, त्या प्रमाणे कारवाई केली जाईल, असे लेखी आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

यू टाइप रस्त्याचे रुंदीकरण रखडले आहे. गटारे आणि पदपथ अर्धवट आहेत. मात्र, पदपथांवरही फेरीवाल्यांच्या अतिक्र मणाकडे महापालिकेच्या ‘जे’ प्रभागाचे दुर्लक्ष झाले आहे. नागरिकांसाठी ते त्रासदायक ठरत आहे. यामुळे आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला.
- शरद पाटील, कल्याण पूर्व विधानसभा सहसंपर्कप्रमुख, शिवसेना

Web Title: Delete road encroachment; U 'type road mismatch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.