काँग्रेसच्या उमेदवारीकरिता बाळ्यामामा जाणार दिल्लीला ?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 05:09 AM2019-03-19T05:09:10+5:302019-03-19T05:10:05+5:30
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे संभाव्य उमेदवार कपिल पाटील यांना आव्हान देण्याची भाषा वरचेवर करणारे सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांना शांत करण्याकरिता शिवसेनेकडून कुठलेच प्रयत्न सुरू असल्याचे दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
ठाणे : भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात शड्डू ठोकू पाहणारे शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांची तलवार म्यान करण्यात शिवसेना यशस्वी झाली असली, तरी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे संभाव्य उमेदवार कपिल पाटील यांना आव्हान देण्याची भाषा वरचेवर करणारे सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांना शांत करण्याकरिता शिवसेनेकडून कुठलेच प्रयत्न सुरू असल्याचे दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. बाळ्यामामा हे काँग्रेसची उमेदवारी मिळवून रिंगणात उडी ठोकणार, अशी चर्चा सुरू असतानाच ते मंगळवारी दिल्लीवारी करणार असल्याची पक्की खबर असल्याने भिवंडीत तर्कवितर्कांना उधाण आले.
मी कुठेही असलो, तरी कपिल पाटील यांच्याविरोधात काम करणार असल्याचा पुनरुच्चार म्हात्रे यांनी वारंवार केला आहे. बाळ्यामामा हे काँग्रेसचे उमेदवार असणार की, अपक्ष रिंगणात उडी घेणार, याबाबतच्या चर्चेने जोर धरला आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा २०१४ च्या निवडणुकीत भाजपाने खेचून आणला. त्यावेळी बाळ्यामामा यांनी पाटील यांच्याविरोधात मनसेतून निवडणूक लढवली होती. त्यानंतर, त्यांनी पाटील यांना आव्हान देण्याकरिताच शिवसेनेत प्रवेश केला. भाजपा व शिवसेना स्वबळावर लढले असते, तर या मतदारसंघात पाटील विरुद्ध म्हात्रे अशी लढत झाली असती. दोन्ही पक्षांची युती झाली असली, तरी आजही पाटील आणि म्हात्रे यांच्यातील वाद शमलेला नाही. अनेक वर्षांपासून त्यांच्यात व्यावसायिक कारणास्तव वाद सुरू आहेत. बाळ्यामामा यांनी अलीकडेच पत्रकार परिषद घेऊन पाटील यांना थेट आव्हान देत त्यांच्याविरोधात काम करणार असल्याचे स्पष्ट केले. यानंतर शिवसेनेच्या श्रेष्ठींनी दखल घेणे गरजेचे होते. ती अद्यापही घेतली गेलेली नाही. दानवे आणि खोतकर यांच्यातील वादावर उद्धव ठाकरे यांनी तोडगा काढून दोघांमध्ये मनोमिलन घडवून आणले आहे. तसे भिवंडीच्या बाबतीत अद्यापही झालेले नाही. म्हात्रे यांची समजूत काढण्याकरिता अद्यापही शिवसेनेकडून कुणीी पुढाकार घेतलेला नाही. आता तर ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढणार, अशी चर्चा असून त्यासाठी काँग्रेसमधील कुणबीसेनेचा नेता त्यांच्यासाठी लॉबिंग करत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
भाजपा व शिवसेनेत पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत घमासान झाले होते. जागावाटपाच्या वाटाघाटीत पालघर व भिवंडी या दोन्ही जागांवर सेनेने दावा केला होता. पालघरवरील दावा भाजपाने सोडला असला, तरी भाजपा आतून बहुजन विकास आघाडीला मदत करण्याची भीती शिवसेनेला वाटते. त्यामुळेच भिवंडीत भाजपा उमेदवारावरील दबाव वाढवण्याकरिता बाळ्यामामा यांच्या असंतोषाला सेनेकडूनच खतपाणी घातले जात असल्याची चर्चा आहे. बाळ्यामामा हे काँग्रेसमधून रिंगणात उतरले, तरीही शिवसेना त्यांना आतून सहकार्य करण्याची भीती भाजपाच्या स्थानिक मंडळींना वाटते. त्यामुळे पालघरमधील संभाव्य दगाफटक्याची सव्याज भरपाई भिवंडीत करण्याची शिवसेनेची रणनीती असल्याचे बोलले जाते. अर्थात, भिवंडीतील संघर्ष चिघळला, तर त्याचे धक्के कल्याण लोकसभा मतदारसंघात जाणवू शकतात, असे काही भाजपाच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
दिल्लीवारीचा निवडणुकीशी संबंध नाही
भिवंडी मतदारसंघातील राजकीय गणिताच्या पार्श्वभूमीवर बाळ्यामामा मंगळवारी दिल्लीवारीला निघाल्याची माहिती हाती आली आहे. मात्र, आपण व्यावसायिक कामानिमित्ताने दिल्लीला जात असल्याचे बाळ्यामामा यांनी सांगितले. आपल्या दिल्लीभेटीचा निवडणुकीशी काहीही संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. परंतु, काँग्रेसचे तिकीट पक्के करण्यासाठीच बाळ्यामामा दिल्लीला रवाना होत असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली.
व्यावसायिक कामासाठी मंगळवारी दिल्लीला जात आहे. त्याचा उमेदवारीशी काहीही संबंध नाही. परंतु, आपण कपिल पाटील यांच्याविरोधातच काम करणार आहोत, हे पक्के आहे.
- सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे