सृजनात्मक खडूशिल्पाचा नाजूक छंद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 12:29 AM2019-12-09T00:29:23+5:302019-12-09T00:30:01+5:30
खडूचा उपयोग काय? असं विचारलं तर सर्वसामान्य माणूस फळ्यावर लिहायला, असं सांगेल.
-अभय फाटक
खडूचा उपयोग काय? असं विचारलं तर सर्वसामान्य माणूस फळ्यावर लिहायला, असं सांगेल. पण, हाच खडू जर एखाद्या सृजन कलाकाराच्या हातात पडला, तर तयार होतं नाजूक हाताने केलेलं खडूशिल्प. शशिधर पांढारकर हे पेशाने इंजिनीअर, पण मनाने कलाकार. ठिसूळ खडूंवर कोरीवकाम करून शशिधर यांनी साकारलेल्या कलाकृती पाहून थक्क व्हायला होतं. इतकंच काय तर दृष्ट लागू नये म्हणून मिरची, लिंबू आणि कोळसा एका तारेत बांधून ठेवण्याची पद्धत आहे. ते सुद्धा खडूमध्ये साकारलं आहे आणि त्याला रंगवलं आहे. घरच्या गणपतीचं मखर दरवर्षी स्वत: बनवताना वेगवेगळे आकृतीबंध त्यांनी साकारले. कधी काडेपेटीच्या काड्यांचा एफेल टॉवर तर कधी सिल्कचा धागा आणि पेपरट्युबपासून केलेला दादर-वरळी सी लिंक.
शशिधर यांनी एफेल टॉवरसाठी २५ दिवस तर सी लिंकसाठी आठ दिवस मेहनत घेतली. खयाखेरीज, मेक इन इंडियाचं शिल्प बनवलं. कधी पाण्याचं पडद्यासारखं कारंजं बनवलं, तर कधी गणपती आणि कार्तिकेयाचा पृथ्वी प्रदक्षिणा करणारा चालणारा देखावा उभा केला. दरवर्षी वाढदिवसाला बाबांकडून हटके ग्रीटिंगकार्ड पाहिजे, हा शशिधर यांनी आपल्या मुलीचा हट्ट वेगवेगळ्या प्रकारची काडर््स बनवून पुरा केला. काळाघोडा कला उत्सवामध्ये स्ट्रिंग आर्ट आणि बुक फोल्डिंग म्हणजे पुस्तकाची आतली, पण घडी करून अर्थपूर्ण आकार करण्याची कला आत्मसात केली. स्ट्रिंग आर्टचे मिनिएचर म्हणजे छोट्या आकाराची पाकिटं (एन्व्हेलप) तयार केले.
आहेर देताना हीच पाकिटे वापरायला सुरुवात केली, जी लोकांना खूप आवडली आणि कौतुक झालं. बुक फोल्डिंग मात्र सोपं नव्हतं, कारण तयार केलेली कलाकृती फक्त बघितली होती. कसं करायचं हे माहीत नव्हतं आणि कसं करायचं हे सांगणारं कोणी नव्हतं. घरी परत जाताना खूप विचार केला आणि एका पुस्तकावर प्रयोग केला. सुरुवातीला सोपा प्रकार करून बघितला. तो जमल्यावर हुरूप आला आणि आता कठीण कलाकृती शशिधर सहजपणे करतात. रेल्वेतून निवृत्त झाल्यावर अनेक छंद जोपासायला सुरुवात केली. कलाकार आणि संग्राहकांशी जोडण्याचा प्रयत्न केला. शशिधर ओरिगामी, क्तिवलिंग, वारली चित्रकला शिकले. शशिधर यांच्या छंदांच्या या प्रवासात त्यांना अरविंद कुलकर्णी आणि आनंद भावे यांचं मार्गदर्शन मिळालं. अनेक प्रदर्शनात भाग घेतला.
केवळ एवढे करून शशिधर थांबले नाहीत. निवृत्त होण्याआधी काही वर्षे नाणी जमवायला सुरुवात केली. भारतातील आणि परदेशांतील नाणी यांच्या संग्रहात आहेत. विदेशी नाण्यांबद्दल माहिती गोळा करणे, त्या देशाच्या करन्सीचा अभ्यास सध्या सुरू आहे. भारतीय नाण्यांमध्ये शशिधर यांच्याकडे पाच रुपयांची ४५ प्रकारची नाणी आहेत आणि २०, ५०, ६०, ७५, १००, १२०, ५००, १००० रुपयांची नाणी यांच्या संग्रहात आहेत.
काडेपेटीचा छंद खरंतर स्वस्तात मस्त म्हणून जोपासला. काडेपेटीमध्ये खूप विविधता आहे. पशू, पक्षी, प्राणी, पाने, फळे, फुले, रोजच्या वापरातील वस्तू अशा वेगवेगळ्या २५०० काडेपेट्या शशिधर यांच्या संग्रहात आहेत. यापुढे शशिधर यांना केरिकेचर (अर्कचित्र), टेराकोटा पॉटरी व पेपर स्कल्पचर शिकायची इच्छा आहे. त्यांच्या छंदाच्या या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.
(लेखक संग्राहक असून द हॉबी सर्कलचे संस्थापक आहेत.)
खडू हाती आला की, आपण सामान्यपणे फळा किंवा पाटीवर लिहू लागतो. पण, तोच खडू जर एखाद्या सृजनात्मक कलाकाराच्या हाती पडला तर... खडूत कोरीवकाम करून अशाच अफलातून कलाकृती निर्माण करण्याचा छंद जडला आहे, तो शशिधर पांढारकर यांना. पेशाने इंजिनीअर असलेले शशिधर यांनी खडूमध्ये कोरीवकाम करून बुद्धिबळाची तयार केलेली प्यादी तसेच पेपरट्युबपासून केलेला वांद्रे-वरळी सी लिंक आकर्षक आहेत. त्यांनी ओरिगामी, क्तिवलिंग, वारली चित्रकला, कॅलिग्राफी, पारचमेंट पेपर आर्ट, त्रिमिती चित्रकला आदी कला जोपासल्या असून त्यांनी काडेपेट्या, नाणी यांचा संग्रहदेखील केलेला आहे.