‘सेल्फी विथ स्वागतयात्रा’ स्पर्धकांकडूनच डिलीट
By admin | Published: April 21, 2016 02:20 AM2016-04-21T02:20:30+5:302016-04-21T02:20:30+5:30
गुढीपाडव्यानिमित्त काढल्या जाणाऱ्या शोभायात्रेत तरुणांचा सहभाग वाढावा, यासाठी यंदा राबवण्यात आलेली ‘सेल्फी विथ स्वागतयात्रा’ ही संकल्पना पुरती फेल गेली आहे.
प्रज्ञा म्हात्रे, ठाणे
गुढीपाडव्यानिमित्त काढल्या जाणाऱ्या शोभायात्रेत तरुणांचा सहभाग वाढावा, यासाठी यंदा राबवण्यात आलेली ‘सेल्फी विथ स्वागतयात्रा’ ही संकल्पना पुरती फेल गेली आहे. ही संकल्पना युवकांपर्यंत पोहोचवण्यात आयोजकांना पुरेसे यश न मिळाल्याने तिला अत्यल्प प्रतिसाद मिळाला असून फक्त सात स्पर्धकांनी सेल्फी पाठवले आहेत.
श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या स्वागतयात्रेत तरुणांचा सहभाग वाढावा, यासाठी ‘सेल्फी विथ स्वागतयात्रा’ ही स्पर्धा यंदा आयोजित करण्यात आली होती. स्वागतयात्रेनिमित्ताने दरवर्षी विविध स्पर्धा राबवल्या जातात. त्यात याही स्पर्धेचा समावेश होता. मात्र, ही संकल्पना अनेकांपर्यंत न पोहोचल्याने किंवा ती पोहोचवण्यात आयोजक अपयशी ठरल्याने, ती संकल्पना स्पष्ट न झाल्याने अवघ्या सात स्पर्धकांचे ३१ सेल्फी प्राप्त झाले.
ही स्पर्धा नक्की काय आहे, याबाबत अनेकांमध्ये संभ्रम होता. त्यामुळे जे काही सेल्फी मिळाले, त्यालाही विशेष असा दर्जा नाही, त्यात कलात्मकता फारशी नसल्याने सातपैकी पाच जणांची निवड करून त्यांनी बक्षीस कसे द्यायचे, असा सवाल परीक्षकांपुढे आहे.
या स्वागतयात्रेत हजारोंच्या संख्येने ठाणेकर सहभागी झाले होते. त्यांच्याकडून निदान १०० सेल्फी तरी परीक्षकांना अपेक्षित होते. मात्र, ही संकल्पना पोहोचवण्यात न्यास कमी पडल्याने अनेकांनी सेल्फी काढूनही स्पर्धेत सहभाग घेतला नसल्याचे काही परीक्षकांचे निरीक्षण आहे.
सेल्फी विथ स्वागतयात्रा म्हणजे नेमके काय? नक्की कसा फोटो काढायचा, त्यात नेमके काय दिसणे अपेक्षित आहे, यासारख्या बाबी ठाणेकरांपर्यंत न पोहोचल्याने काही तरुणांनी सहभाग घेणेच टाळल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे पहिल्या प्रयत्नातच ही संकल्पना डिलीट झाली. त्यामुळे पुढच्या वर्षी सेल्फी विथ स्वागतयात्रेसाठी एक स्वतंत्र कार्यशाळा आयोजित करण्याचा फोटो सर्कल सोसायटीचा मानस आहे.