रेल्वेस्थानकातील प्रथमोपचार केंद्रात प्रसूती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 12:37 AM2018-08-23T00:37:39+5:302018-08-23T00:38:05+5:30
महिलेने कन्येला जन्म दिला असून मायलेक सुखरूप आहेत.
ठाणे : प्रसूतिवेदना सुरू झाल्याने रु ग्णालयाकडे निघालेल्या एका २३ वर्षीय महिलेची ठाणे रेल्वेस्थानकातील प्रथमोपचार केंद्रामध्ये (वन-रूपी क्लिनिक) मंगळवारी रात्री प्रसूती झाली. महिलेने कन्येला जन्म दिला असून मायलेक सुखरूप आहेत. त्यांना उपचारार्थ ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. रेल्वेप्रवासातील प्रसूतीची ठाणे रेल्वेस्थानकातील वर्षभरात घडलेली ही तिसरी घटना आहे.
हरजित कौर हे या महिलेचे नाव असून ती दिव्याची रहिवासी आहे. मंगळवारी रात्री प्रसूतिवेदना सुरू झाल्याने ती नातेवाईकांसोबत दिव्यातून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाकडे लोकलने जात होती. दरम्यान, ठाणे स्थानकात उतरल्यानंतर तिला प्रसुतीकळांचा त्रास वाढू लागल्या. त्यामुळे महिलेच्या नातेवाईकांनी रेल्वे प्रबंधक कार्यालयाकडे धाव घेऊन मदतीची विनंती केली. त्यानुसार रेल्वे उपप्रबंधक अपर्णा देवधर, पॉइंटमन मनीषा पाटले आणि लोहमार्ग पोलीसांनी तातडीने हालचाली करून तिला नातेवाइकांच्या मदतीने रेल्वेस्थानकातील प्रथमोपचार केंद्राच्या क्लिनिकमध्ये नेले. तिथे रात्री १०.१५ च्या सुमारास महिलेची नॉर्मल प्रसूती झाली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला.
रेल्वेप्रवासात प्रसूती होण्याची या वर्षभरातील ही तिसरी घटना आहे. ती लोकलमध्ये न होता स्थानकातील प्रथमोपचार केंद्रात सुखरूपरीत्या झाली. मायलेकीला उपचारार्थ शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
- सुरेंद्र महीधर,
प्रबंधक, ठाणे रेल्वेस्थानक
संबंधित महिला प्रसूतिवेदना सुरू झाल्यानंतर रुग्णालयाकडे निघाल्या होत्या. रेल्वेस्थानकातील क्लिनिकमध्ये तिची नॉर्मल प्रसूती झाली असून दोघीही सुखरूप आहेत. अशी परिस्थिती असताना शक्यतो प्रवास करू नये. त्वरित जवळच्या रुग्णालयात जावे.
- डॉ. राहुल घुले,
सीईओ, वन-रूपी क्लिनिक