महिला शिवसैनिकांकडून नायजेरियन महिलेची प्रसूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 11:52 PM2020-09-21T23:52:59+5:302020-09-21T23:54:07+5:30
धीरज परब। लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : हाटकेश भागात नायजेरियन नागरिकांच्या गैरप्रकारांविरोधात शिवसेना सतत आंदोलने करत आहे. मात्र, ...
धीरज परब।
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : हाटकेश भागात नायजेरियन नागरिकांच्या गैरप्रकारांविरोधात शिवसेना सतत आंदोलने करत आहे. मात्र, याच भागात मानसिक संतुलन बिघडलेल्या नायजेरियन तरुणीचे महिला शिवसैनिकांनी रविवारी बाळंतपण केल्याची घटना घडली आहे. सार्वजनिक ठिकाणी ती प्रसूतिवेदनेने विव्हळत पडलेली पाहून छाया कापडणेकर आणि सहकारी धावून गेल्या.
या भागात गेल्या दीड-दोन वर्षांपासून गिफ्ट नावाची ३० वर्षीय नायजेरियन तरुणी भटकत असते. तिचे मानसिक संतुलन बिघडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यातच ती गरोदर राहिली. रविवारी ती मंगलनगर येथील पालिका मंडईच्या प्रवेशद्वारावर अर्धनग्नावस्थेत प्रसूतिवेदनांनी विव्हळत होती. तिला पाहून शिवसेनेच्या महिला शाखा संघटक कापडणेकर आणि विमल ठेंगे, ईस्टर नाडार या धावून गेल्या. त्यांनी तिला मंडईत घेऊन तेथील गोणी आदींच्या साहाय्याने पडदा तयार केला. अन्य महिलांच्या मदतीने त्यांनी नायजेरियन तरुणीचे सुखरूप बाळंतपण केले.