रेल्वे स्थानकातील प्रथमोपचार केंद्रात महिलेची प्रसूती; दोघेही सुखरूप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 11:02 PM2019-04-06T23:02:36+5:302019-04-06T23:02:49+5:30
टिटवाळा येथून रुग्णालयात निघालेल्या इर्शात शेख (21) या महिलेला लोकलमध्ये प्रसूतीच्या वेदना होण्यास सुरूवात झाल्या.
ठाणे: टिटवाळा येथून रुग्णालयात निघालेल्या इर्शात शेख (21) या महिलेला लोकलमध्ये प्रसूतीच्या वेदना होण्यास सुरुवात झाल्या. त्या महिलेला ठाणे रेल्वे स्थानकात उतरून तिची ठाणे रेल्वे स्थानकातील प्रथमोपचार केंद्रात सुखरूप प्रसूती केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. शेख या महिलेला मुलगा झाला असून ते दोघेही सुखरूप असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
टिटवाळा येथील रहिवासी असलेली इर्शात ही महिला कुटुंबीयांसह रुग्णालयात प्रसूतीसाठी टिटवाळा अप जलद लोकलने सायन रुग्णालयात जाण्यासाठी निघाली होती. डोंबिवली सोडल्यानंतर तिला अचानक प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या होत्या. याचदरम्यान, आरपीएफ हेल्पलाईनवरून ठाणे रेल्वे स्थानक प्रबंधक कार्यालयात त्याबाबत माहिती मिळाली. तात्काळ, उपप्रबंधक आर. के. दिवाकर, काटेवाला मनीषा पाटले यांनी ठाणे लोहमार्ग पोलीस वर्षा मदणे यांच्यासह फलाट क्रमांक 6 वर धाव घेतली. ती लोकल सायंकाळी 6.15 वाजता फलाटाला लागताच, त्या महिलेला स्टेजरवरून ठाणे रेल्वे स्थानकातील प्रथमोपचार केंद्रात (वन रूपी क्लिनीक) उपचारार्थ दाखल केले.
तेथे सहा वाजून 35 मिनिटांनी त्या महिलेची प्रथमोपचार केंद्रातील डॉक्टर राठोड, लतिका कोतवाल आणि परिचारिका कोमल आणि भावना यांनी तिची सुखरूप प्रसूती केली. त्यानंतर त्या दोघांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. प्रथमोपचार केंद्र सुरू झाल्यापासून आतापर्यंत ही तिसरी सुखरूप प्रसूती असल्याची माहिती प्रथमोपचार केंद्राचे संचालक डॉ. राहुल घुले यांनी दिली.