डेल्टा प्लस व्हेरिएंटने वाढविली ठाणे जिल्ह्याची चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:27 AM2021-06-25T04:27:56+5:302021-06-25T04:27:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंटचे २२ रुग्ण देशात सापडले असून यात सर्वाधिक महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंटचे २२ रुग्ण देशात सापडले असून यात सर्वाधिक महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे सर्वच जिल्ह्यांची चिंता वाढली आहे. ठाण्यातील बदलापूर भागातही याचा पहिला रुग्ण आढळला होता. मात्र, तो तेथील नसून तो रायगडमधील असल्याची माहिती समोर आली. परंतु, त्यानंतर आता जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. हा रुग्ण सापडल्यानंतर हजारो चाचण्या केल्या असून नवा रुग्ण अजूनही आढळला नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. परंतु, खबरदारीच्या सूचना दिल्या असून जिल्हा आरोग्य यंत्रणा त्या दृष्टीने सज्ज झाली आहे.
त्या रुग्णावर योग्य उपचार झाले असून तो आता सुस्थितीत असल्याचेही स्पष्ट केले आहे. त्याच्या संपर्कात आलेल्यांच्या चाचण्या केल्या असून त्यातून या डेल्टाचा दुसरा कोणताही रुग्ण सध्या जिल्ह्यात आढळला नसल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने स्पष्ट केले. परंतु, यापुढे हा नवा स्ट्रेन रोखण्यासाठी खबरदारी मात्र जिल्हा आरोग्य विभागाने घेतली आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात याचा प्रसार होऊ नये, यासाठी बुधवारी आरोग्य विभागाने जिल्ह्यातील सर्व महापालिकांच्या आरोग्य विभागाच्या बैठका घेऊन त्यांना यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जिल्ह्यात ११ हजार ५७४ ऑक्सिजन बेड सज्ज ठेवले आहेत. तसेच व्हेंटिलेटर एक हजार १०९, आयसीयूचे तीन हजार ४१३ असे एकूण २८ हजार २३३ बेड जिल्ह्यात सज्ज ठेवले आहेत. तसेच नागरिकांनी वेळोवेळी हात स्वच्छ धुवावेत, तोंडाला मास्कचा वापर करावा, तसेच लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहनही केले आहे.
कोरोनाचे एकूण रुग्ण - ५,२९,३३८
बरे झालेले रुग्ण - ५,१३,०२६
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण - ४,३५८
कोरोना बळी - १०,५४८
जिल्ह्यात काय खबरदारी
जिल्ह्यात सध्या डेल्टाचा एकही रुग्ण आढळला नसला तरीदेखील भविष्यात रुग्ण आढळला तर कशाप्रकारे काळजी घेणे गरजेचे आहे, याची तयारी जिल्हा आरोग्य यंत्रणेने केलेली आहे. सर्व महापालिकांच्या आरोग्य विभागाच्या बैठका घेऊन त्यांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. बेडच्या उपलब्धतेबरोबर, औषधांचा पुरवठा योग्य पद्धतीने ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.
दररोज १५ हजार चाचण्या
ठाणे जिल्ह्यात सहा महापालिका आणि दोन नगरपालिका आणि चार तालुक्यांतर्गत रोजच्या रोज सुमारे १५ हजारांच्या आसपास कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत. कोरोना रुग्णांचे प्रमाण जिल्ह्यात कमी होत असल्याने चाचण्यादेखील कमी होऊ लागल्या आहेत.
सध्या जिल्ह्यात दररोज १५ हजारांच्या आसपास आजही कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. परंतु, त्यातून ३०० ते ४५० जण हे पॉझिटिव्ह आढळत आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने, कोरोना चाचण्यांचे प्रमाण घटले आहे. तसेच रुग्णवाढीचा दरही खाली आला आहे. त्यामुळेच आजघडीला कोरोना रुग्ण कमी प्रमाणात आढळत आहेत.
.........
ठाणे जिल्ह्यात डेल्टाचा रुग्ण आढळला असला तरी तो येथील नसून रायगडमधील आहे. त्याच्यावर योग्य उपचार करून तो बरा झालेला आहे. परंतु, त्यानंतर सध्या तरी जिल्ह्यात अशा स्वरूपाचा नवा रुग्ण आढळलेला नाही. भविष्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व जिल्हा आरोग्य यंत्रणांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.
(कैलास पवार - जिल्हा शल्यचिकित्सक - ठाणे)