आमदार होण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नावाने 10 कोटींची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 01:14 PM2018-03-21T13:14:42+5:302018-03-21T13:14:42+5:30
विधान परिषदेवर आमदार होण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नावाने 10 कोटींची मागणी करण्यात आली आहे. फोनवरून मुख्यमंत्र्यांचा हुबेहूब आवाज काढून ही मागणी करण्यात आली होती.
ठाणे - विधान परिषदेवर आमदार होण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नावाने 10 कोटींची मागणी करण्यात आली आहे. फोनवरून मुख्यमंत्र्यांचा हुबेहूब आवाज काढून ही मागणी करण्यात आली होती. ठाण्यातील भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांना अशा प्रकारची मागणी करणारा फोन आला असून, 25 लाख स्वीकारणाऱ्या महिलेसह एकाला गुन्हे शाखेने अटक केली आहे. अशा पद्धतीने आणखीही लोकांची फसवणूक झाल्याचा पोलिसांना संशय आहे. कासारवडवली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण येथील गोविंदवाडीची रहिवासी अनुद सज्जाद शिरगावकर (२९), नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील अनिलकुमार शंकरलाल भानुशाली (३१) आणि पुण्यातील आळेफाटा येथील अब्दुल फय्याज अन्सारी (२४) ही या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. आरोपी अनिलकुमार भानुशाली याने जून-जुलै २०१८ मध्ये विधान परिषदेची आमदारकी मिळवून देण्याची बतावणी करून ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक-२ चे भाजपाचे नगरसेवक मनोहर जयसिंग डुंबरे यांच्याशी संपर्क साधला होता. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळचे संबंध आहेत, अशा थापा त्याने मारल्या. आमदारकीसाठी १० कोटी रुपये खर्च येईल. ही रक्कम टप्प्याटप्प्याने द्यावी लागेल. पाच कोटी रुपये आधी आणि पाच कोटी रुपये शपथविधीनंतर द्यावे लागतील, असेही त्याने डुंबरे यांना सांगितले.
२५ वर्षांपासून राजकारणात असलेल्या डुंबरे यांना एकूणच प्रकार संशयास्पद वाटला. त्यामुळे त्यांनी हा विषय थेट मुख्यमंत्र्यांना कळवला. मुख्यमंत्र्यांनी त्याची गांभीर्याने दखल घेऊन पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, आरोपींच्या अटकेसाठी डुंबरे यांनी पोलिसांच्या मदतीने सापळा रचला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांसोबत काम करणारी एक महिला आमदारकीसाठी मदत करणार असल्याचे अनिल भानुशाली याने डुंबरे यांना सांगितले. आमदारकीसाठी तुमच्या बायोडाटावर मुख्यमंत्र्यांची मंजुरी घ्यावी लागेल. महिलेच्या मदतीने ती मंजुरीही मिळून जाईल, असे तो म्हणाला. त्याच्या म्हणण्यावरून डुंबरे यांनी स्वत:चा बायोडाटा दिला. त्यानंतर, सोमवारी महिलेने डुंबरे यांना फोन करून त्यांचा बायोडाटा मुख्यमंत्र्यांनी मंजूर केला असल्याचे सांगितले. कॉन्फरन्स कॉलद्वारे मुख्यमंत्री स्वत: बोलणार आहेत, असेही तिने डुंबरे यांना सांगितले. त्यानंतर, पलीकडून दुसºया आरोपीने मुख्यमंत्र्यांच्या आवाजात डुंबरे यांना महिला म्हणेल तसे काम करण्याचे आदेश दिले. बायोडाटा मुख्यमंत्र्यांनी मंजूर केल्यामुळे २५ लाख रुपयांचे टोकन तिने डुंबरे यांना मागितले.