पोलिसाला कोरोना झाल्याने मास्क न घालताच मॉर्निग वॉक करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 08:25 AM2020-07-31T08:25:17+5:302020-07-31T08:25:34+5:30
भाईंदर पश्चिमेला राधास्वामी सत्संग मार्गावर कांदळवनाचे दाट जंगल असून या ठिकाणी खारवी समाजाची तुरळक लोकवस्ती आहे . या मार्गावर शहरातून सकाळी आणि सायंकाळी मोठ्या संख्येने लोकं मॉर्निंग वॉक , सायकलिंग व धावण्यासाठी येतात .
मीरारोड - भाईंदर पश्चिमेच्या राधास्वामी सत्संग मार्गावर सकाळी व सायंकाळी मास्क न घालताच व घोळक्याने फिरणाऱ्या बेजबाबदार लोकांवर कारवाईची मागणी नागरिकांनी चालवली आहे . कारण रोज सकाळी मित्र मंडळी सह वॉक ला येणारा पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाला असून त्याला भाईंदरच्या जोशी रुग्णालयात दाखल केले आहे .
भाईंदर पश्चिमेला राधास्वामी सत्संग मार्गावर कांदळवनाचे दाट जंगल असून या ठिकाणी खारवी समाजाची तुरळक लोकवस्ती आहे . या मार्गावर शहरातून सकाळी आणि सायंकाळी मोठ्या संख्येने लोकं मॉर्निंग वॉक , सायकलिंग व धावण्यासाठी येतात . यात नागरिकांसह काही नगरसेवक , पोलीस , पालिका कर्मचारी , व्यावसायिक आदी बड्या लोकांचा देखील सहभाग असतो .
गर्दी इतकी असते की गाड्यांना तर पार्किंगला जागा नसते . एरव्ही लोकांना मास्क घाला , डिस्टंसिंग पाळा सांगणारे नगरसेवक आदी अनेक जबाबदार मंडळीच या ठिकाणी मास्क न घालताच फिरताना दिसतात . मास्क न घालताच सोशल डिस्टनसिंग चे उल्लंघन करून घोळका करत गप्पा मारतात वा चालताना लोकं दिसतात . त्यातही येथे येणारी नगरसेवक, कार्यकर्ते आदी बडी मंडळी असल्याने पालिका आणि पोलीस देखील त्यांच्यावर कारवाई करत नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे .
रोज सकाळी मित्र मंडळीसह धावण्यासाठी जाणारा पोलीस कर्मचारी हा कोरोना पॉझिटिव्ह झाला असून त्यांना भाईंदरच्या भीमसेन जोशी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे . सदर पोलीस कर्मचारी मीरारोड पोलीस उपविभागीय कार्यालयात कार्यरत असल्याने तेथील पोलीस कर्मचारी देखील धास्तावले आहेत .
राधास्वामी सत्संग मार्गावर मोठ्या संख्येने येणाऱ्या लोकां मुळे गर्दी होत असून ही लोकं मास्क पण घालत नसल्याने स्थानिक रहिवासी देखील संतापले आहेत.