बंदी काळात अनधिकृत मासेमारी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 08:04 PM2020-06-09T20:04:52+5:302020-06-09T20:05:02+5:30

अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे कार्याध्यक्ष बर्नड डिमेलो यांची मागणी

Demand for action against unauthorized fishing during ban | बंदी काळात अनधिकृत मासेमारी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी 

बंदी काळात अनधिकृत मासेमारी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी 

Next

मीरारोड - राज्यात मासेमारी बंदी कालावधी 1 जून ते 31 जुलै असा असून देखील वसई तालुक्यातील काही बोटी बंदी काळात समुद्रात अनधिकृत मासेमारी  करत असल्याने त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे कार्याध्यक्ष बर्नड डिमेलो यांनी केली आहे . 

मासेमारीचा बंदी कालावधी सुरु झाला की कायदेशीर मासेमारी परवाने घेऊन मासेमारी करणारे मच्छिमार आपआपले परवाने जमा करून आपल्या बोटी किनाऱ्यावर घेतात. ज्या मच्छिमार संस्थेचा सभासद बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळला तर संबंधित संस्था व सभासद ह्याच्यावर कारवाई करून त्यांचा डिझेल कोटा बंद करण्यात येईल असा आदेश मत्स्य व्यवसाय विभागाने आधीच मच्छिमारांना दिलेला आहे. 

मत्स्यबीज व मासळीची पैदास चांगली व्हावी यासाठी देखील मासेमारी बंदीचे काटेकोर पालन करणे मच्छिमारांच्या हिताचेच असते . तसे असताना वसई, नायगांव, खोचिवडे या बंदरातून सुमारे 15 ते 20 बोटी बंदी काळात अनधिकृतपणे सर्रास आर्थिक हव्यासापोटी मासेमारी करीत आहेत. सदर बोटींना कुठल्याही प्रकारची कागदपत्रे , परवाना नसून त्यांना कुठल्याही प्रकारची कायद्याची भीती नाही. मत्स्य विभागाच्या परवाना अधिकाऱ्या पासून आयुक्त यांना भ्रमणध्वनी वरून या बाबत तक्रार करून कारवाई करण्यास कळवले. परंतु अजून कोणतीच कारवाई केली जात नाही . 

या बेकायदेशीर मासेमारीमुळे उत्तन भागातील मच्छिमारां कडून त्यांच्या संस्थांना विचारणा होत आहे. एकतर अनधिकृत मासेमारी थांबवा नाहीतर आम्हाला पण परवानगी द्या अशी भूमिका ते घेत असल्याने यातून नवा वाद निर्माण होण्याची भीती आहे . या अनधिकृत बोटी तात्काळ बंद न केल्यास आम्हीसुद्धा आमच्या  बोटी समुद्रात उतरवू असा इशारा उत्तनच्या मच्छीमारांनी दिला आहे. त्यामुळे चौकशी करून अनधिकृत मासेमारी करणाऱ्या बोटी ताब्यात घ्याव्यात . बोटी व बोटीतील साहित्य जप्त करून फौजदारी गुन्हे दाखल करावे जेणेकरून या पुढे बंदी कालावधीत कोणी मासेमारी करण्यास धजावणार नाही असे डिमेलो यांनी सांगितले.

Web Title: Demand for action against unauthorized fishing during ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.