अनधिकृत बांधकामप्रकरणी कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:46 AM2021-09-05T04:46:10+5:302021-09-05T04:46:10+5:30
ठाणे : कळवा खारेगाव भागात बनावट दस्तऐवज बनवून शासकीय भूखंडांवर झालेल्या अनधिकृत बांधकामांबाबत काँग्रेसने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ...
ठाणे : कळवा खारेगाव भागात बनावट दस्तऐवज बनवून शासकीय भूखंडांवर झालेल्या अनधिकृत बांधकामांबाबत काँग्रेसने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. यामध्ये पालिकेचे तब्बल ५५० कोटींचे नुकसान झाल्याचा दावा काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय घाडीगावकर यांनी केला आहे. यास जबाबदार पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून ज्या नागरिकांची फसवणूक झाली आहे, त्यांना व्याजासह पैसे परत करण्याची मागणीदेखील त्यांनी केली आहे.
कळवा खारेगाव परिसरातील शासकीय भूखंडांवर बनावट कागदपत्रांच्या आधारे बांधकाम उभे करून स्थानिक बिल्डरांकडून सरकारची तसेच लोकांची फसवणूक करण्यात येत आहे. या इमारती बांधताना, शासनाची तसेच महापालिकेची परवानगी घेण्यात आली नसून, ही सर्व अनधिकृत बांधकामे २०२० ते २२ जुलै २०२१ या सहा महिन्यात केली आहेत. संबंधित विकासक आणि अधिकाऱ्यांची मालमत्ता जप्त करून, यामध्ये सदनिका विकत घेणाऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे.