रस्त्यावरील बेवारस वाहनांवर कारवाई करण्याची मागणी; ड्रायव्हिंग स्कूलची वाहनेही रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 00:51 IST2020-01-13T00:51:04+5:302020-01-13T00:51:14+5:30
रिक्षा युनियनचा आक्षेप

रस्त्यावरील बेवारस वाहनांवर कारवाई करण्याची मागणी; ड्रायव्हिंग स्कूलची वाहनेही रस्त्यावर
डोंबिवली : रस्त्यावरील बेवारस वाहनांवर तातडीने कारवाई करावी आणि वाहतूककोंडीतून पश्चिमेकडील नागरिकांची सुटका करावी, अशी मागणी रिक्षा-चालक-मालक युनियनचे उपाध्यक्ष शेखर जोशी यांनी केली. पश्चिमेला स्थानक परिसरात कशाही रिक्षा उभ्या असतात, याबद्दल जागरूक नागरिकांनी वाहतूक विभागाला तक्रारी केल्या आहेत. त्याची दखल घेत युनियनने भंगार वाहनांवर कारवाई करावी, असे म्हटले आहे.
जोशी यांनी सांगितले की, स्थानक परिसरात असो अथवा पश्चिमेला पूर्वेकडे जेवढ्या मोठ्या प्रमाणात टोइंगची कारवाई वाहतूक विभाग करते, त्या तुलनेने पश्चिमेला होत नाही. त्यामुळे वाहनचालक ठिकठिकाणी सर्रास नियमांचे उल्लंघन करताना आढळतात. दुतर्फा वाहने उभी केली जात असल्यामुळे समस्येत भर पडते.
दीनदयाळ रस्त्यावरील सम्राट चौक परिसरात कोंडी असते. घनश्याम गुप्ते रस्ता, गोपी चौक, महात्मा फुले रस्त्यावर कोल्हापुरे चौकातही वाहतूककोंडीची मोठी समस्या आहे. सुभाष रस्ताही अरुंद असल्याने नवापाडा ते कुंभारखाणपाडा भागात कोंडी होते. ही कोंडी फोडण्यासाठी वाहतूक विभागाची इच्छाशक्ती नसल्याने समस्या जटिल बनत आहे. यासंदर्भात वाहतूक विभागाची कारवाई सुरूच असते, पण कोपर पूल बंद केल्याने पश्चिमेला कारवाई करण्यासाठी जाताना अडथळे येत असल्याचे सांगितले. मात्र, या अडथळ्यांनंतरही कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. तरीही कुठे वाहने उभी करत असतील, तर कारवाई करण्यात येईल, असेही सांगण्यात आले.
नियमांचे होतेय उल्लंघन
शहरातील अनेक ड्रायव्हिंग स्कूलची वाहने रस्त्यावर उभी केली जात आहेत. पार्किंग सुविधा असेल तरच ड्रायव्हिंग स्कूलसाठी परवानगी देण्यात येते. मात्र, या नियमाचे उल्लंघन होत असल्यामुळे कोंडीच्या समस्येत भर पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
त्यासाठी वाहतूक विभाग असो की, आरटीओ अधिकारी असोत, या सर्वांनी तातडीने पाहणी करून समस्या मार्गी लावावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.