कल्याण-डोंबिवलीत नायलॉन मांजावर बंदी आणण्याची पक्षीमित्रांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 04:39 PM2019-01-08T16:39:51+5:302019-01-08T16:40:17+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात नायलॉन मांज्याच्या विक्रीस बंदी आणावी आणि ज्या दुकानांत नायलॉनचा मांजा विकला जातो, अशा दुकानांवर कठोर कारवाई करावी
डोंबिवली - मकरसंक्रांतीचे वेध लागले, की आकाशात पतंग उडविण्यासाठी ठिकठिकाणी मुलांमध्ये स्पर्धा रंगते. पतंग उडवण्याचा मनमुराद आनंद लुटला जातो; मात्र या खेळात पक्ष्यांच्या जीवाशीही खेळ खेळला जातो. पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉनच्या मांज्यामध्ये अडकून अनेक पक्षी जखमी होत असल्याची खंत पक्षिप्रेमींनी व्यक्त केली आहे. तेव्हा छंद जोपासा पण निसर्गाची हानी करू नका असे आवाहन पक्षीमित्र, प्राणीमित्र पॉझ संघटनेचे संस्थापक निलेश भणगे यांनी केले आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात नायलॉन मांज्याच्या विक्रीस बंदी आणावी आणि ज्या दुकानांत नायलॉनचा मांजा विकला जातो, अशा दुकानांवर कठोर कारवाई करावी, असे मत डोंबिवली भणगे यांनी व्यक्त केले आहे. नायलॉनचा मांजा तुटत नसल्यामुळे उडणारे पक्षी त्यात अडकून पडतात आणि वेळेत त्यांची सुटका न केल्यास ते तडफडतात. सुती मांजाचा वापर पतंगप्रेमींनी करावा, असेही भणगे यांनी सांगितले आहे.
गेल्या वर्षी घुबडा शिवाय तीन दिवसात १ वटवाघुळ, २ कबुतर जखमी अवस्थेत सापडले असून त्याच्यावर उपचार केले होते. 8 ते 12 जानेवारी या दरम्यान पक्षी जखमी होण्याचे प्रमाण जास्त वाढले असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या पतंग उडविण्याच्या नादात जैव विविधतेला त्रास होणार नाही, अशा पध्दतीने सण साजरे करावे असे आवाहन भणगे यांनी केले आहे. तसेच जखमी पक्षी आढळल्यास मदतीसाठी 9820161114 / 9920777536 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.