फटाक्यांची मागणी घटली
By admin | Published: November 12, 2015 01:42 AM2015-11-12T01:42:28+5:302015-11-12T01:42:28+5:30
वाढती महागाई,रिअल इस्टेट व्यवसायात असलेली मंदी तसेच शाळेत शिकवण्यात येणारे पर्यावरण शिक्षण, तसेच १२५ डेसीबलपेक्षा जास्त आवाजाचे फटाके वाजवण्यास पोलीसांनी बंदी
भाग्यश्री प्रधान, ठाणे
वाढती महागाई,रिअल इस्टेट व्यवसायात असलेली मंदी तसेच शाळेत शिकवण्यात येणारे पर्यावरण शिक्षण, तसेच १२५ डेसीबलपेक्षा जास्त आवाजाचे फटाके वाजवण्यास पोलीसांनी बंदी आणली असल्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी फटाक्यांच्या विक्रीमध्ये ५० टक्के घट झाली आहे.
पुर्वी बांधकाम व्यावसायिक व व्यापारी हजारो रुपयांचे फटाके विकत घेत होते मात्र यावर्षी त्यांनी याकडे पाठ फिरवल्याने फटाके विक्रेत्यांना आर्थिकदृष्ट्या फटका बसला आहे. दिवाळीमध्ये रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवण्यात येतात त्यामुळे रहिवाश्यांच्या तसेच प्रवासी नागरिकांच्या जीवास धोका निर्माण होतो. त्यामुळे १२५ डेसीबल आवाजापेक्षा जास्त आवाजाचे फटाके वाजवू नयेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यास ८ दिवसांचा तुरूंगवास तसेच १ हजार २५० रुपयांचा दंड होणार असल्याने तसेच रात्री १० ते सकाळी ६ यावेळेत फटाके उडवू नयेत असेही बंधन असल्याने फटाक्यांची खरेदी घटली. फटाक्यांची दुकाने केवळ मैदानातच तिही ३ दिवस आधी सुरु करण्याचे बंधन घातल्याने तसेच चायनिज फटाक्यांवर पूर्ण बंदी घातल्याने त्याचाही फटका या विक्रीला बसला. पर्यावरण आणि पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण निर्मूलन या बाबतची वाढत असलेली जागृती देखील याला कारणीभूत आहे.
वाढत्या महागाईमुळे ऐन दिवाळी सणात फटाक्यांचा खर्च तितका कमी करता येतो. या सर्व कारणांचा परिणाम फटाके वाजवण्यावर झाला आहे. कुठल्याही देवा धर्माचे फोटो असलेले फटाके वाजवता येणार नसल्याचाही नियम आहे. फटाके हे मोकळ्या जागेतच उडवावे असा नियम करून रस्ते, गल्या बोळी येथे ते उडविण्यास मनाई केल्याने त्याचा फटकाही या व्यापाराला बसला. फॅन्सी फटाके घेण्याकडे गिऱ्हाईकांचा कल अधिक आहे.
ठाणे जिल्ह्यातील वाडा या ठिकाणी फटाक्यांची विक्री सर्वाधिक होत आहे. याचे मुख्य करण वाडा हे ग्रामीण भागात मोडत असल्याने फटाक्यांना आॅक्ट्रॉय भरावा लागत नाही. परंतु येथेही फटाक्यांची खरेदी कमी झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. पर्यायाने ध्वनी प्रदुषण आणि वायु प्रदुषण कमी झाले आहे.