पाण्याची आणीबाणी जाहीर करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 11:48 PM2019-05-13T23:48:11+5:302019-05-13T23:48:17+5:30
एकीकडे ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अवघे १८ ते २० टक्के पाणी शिल्लक आहे. तर दुसरीकडे घरामागे २०० रुपये पाण्याला मोजावे लागत आहेत.
ठाणे : एकीकडे ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अवघे १८ ते २० टक्के पाणी शिल्लक आहे. तर दुसरीकडे घरामागे २०० रुपये पाण्याला मोजावे लागत आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात पाण्याची मोठी टंचाई भेडसावत आहे. सक्रीय टँकरलॉबीकडून मिळणाºया हप्त्यांमुळे सत्ताधारी पाण्याचा प्रश्न मार्गी लावत नाहीत, असा आरोप करून पाण्याची आणीबाणी जाहीर करावी, अशी मागणी राष्टÑवादीचे राष्टÑीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी केली. ठाण्यासाठी धरणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत महापालिकेची एकही महासभा होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी सोमवारी दिला.
पालिका क्षेत्रातील लोकमान्यनगर, घोडबंदर रोड, इंदिरानगर, कळवा, मुंब्रा आणि दिवा या सर्वच भागात पाण्याचे प्रचंड दुर्भीक्ष्य आहे. पाणी सोडणारे व्हॉल्व आॅपरेटर हे पाण्याचे दलाल असून पैसे घेऊनच पाणी सोडण्याचे प्रताप ते करीत आहेत. त्यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करून शहरात पाण्याची आणीबाणी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे त्यांनी केली. यावेळी शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि ठामपाचे विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील उपस्थित होते.
विशेष म्हणजे हिरानंदानी मेडोज या उच्चभ्रू सोसायटीच्या सेक्रेटरी अर्चना वैद्य यांनीही वर्षभर पाण्याची टंचाई भेडसावत असून टँकरशिवाय पर्यायच नसल्याचे पत्रकारांना सांगितले. स्मार्ट सिटीचा बोजवारा उडाला आहे. २५ वर्षांच्या सत्तेत पाणी कुठे मुरले, हे सत्ताधाऱ्यांनी जाहीर करावे. सध्या ठाण्यात टँकरलॉबी कार्यरत आहे. सर्वच गृहसंकुलांना टँकरने पाणीपुरवठा होतो. यावर कायमस्वरुपी तोडगा काढला पाहिजे. हे टँकर कोणाचे आहेत, याचे सूत्रधार कोण आहेत? याची चौकशी केली पाहिजे. मात्र, पाण्याच्या वाटपावर काहीजणांची रोजीरोटी चालत आहे; त्यातून त्यांच्या नेत्याला ‘हप्ते’ मिळत आहेत. त्यामुळेच धरण बांधले जात नसल्याचे ते म्हणाले.