शहापूर तालुका विभाजनाची मागणी
By Admin | Published: August 30, 2015 11:33 PM2015-08-30T23:33:06+5:302015-08-30T23:33:06+5:30
भौगोलिक क्षेत्रफळ आणि लोकसंख्येने अन्य तालुक्यांच्या मानाने ठाणे जिल्ह्यातला सर्वात मोठा तालुका म्हणून ओळख असलेल्या शहापूरच्या विभाजनाच्या रखडलेल्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे
शहापूर: भौगोलिक क्षेत्रफळ आणि लोकसंख्येने अन्य तालुक्यांच्या मानाने ठाणे जिल्ह्यातला सर्वात मोठा तालुका म्हणून ओळख असलेल्या शहापूरच्या विभाजनाच्या रखडलेल्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. वाडा तालुक्याचे विभाजन करुन विक्रमगड तालुका झाला तेंव्हा, तसेच जिल्ह्याचे विभाजन करुन नवीन पालघर जिल्हा स्थापन केला तेंव्हा देखिल शहापूरचेही विभाजन अपेक्षीत मानले जात होते. मात्र धुरंधर राजकीय नेतृत्वाची उणीव असल्याने या मागणीकडे दुर्लक्षच करण्यात आले.
ठाणे जिल्ह्याचे आता पुन्हा दुसर्यांदा होऊ घातलेले विभाजन राज्य शासनाकडे प्रस्तावित आहे. कल्याण या नव्या जिल्ह्याच्या निर्मितीची मागणी केली जात आहे. अशावेळी शहापूरचे रखडलेले विभाजन येथील जनतेला होईल असे वाटू लागले आहे. विभाजनातला संभाव्य तालुका म्हणून किन्हवली, कसारा, खर्डी, वासिंद या मध्यवर्ती ठिकाणांची नावे गेली पंचवीस वर्षे चर्चेत आहेत. पण शहापूरचे विभाजन काही झाले नाही.
परंतु किन्हवली तालुका करण्याच्या मागणीने जोर धरल्यानंतर किरण निचिते यांनी वासिंद तालुका करण्याची तर दिलीप अधिकारी, बबन शेलवले यांनी खर्डी तालुक्याची मागणी पुढे रेटली आहे. नुकतेच किन्हवलीतील रहीवाशांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुन्हा तालुका विभाजनाच्या मागणीला तोंड फोडले आहे.
नवीन किन्हवली तालुका करतांना मुरबाड तालूक्यातील सरळगांव, टोकावडे भागातील गावांचा समावेश करता येऊ शकतो, खर्डी अथवा कसारा तालुका झाल्यास लगतच्या वाडा, मोखाडा तालुक्यातील आदिवासी, दुर्गम गांवे, वस्त्यांना न्याय मिळेल असे मानले जात आहे, तर वासिंद हा कल्याणच्या ग्रामिण भागातील गावांसह मध्यवर्ती तालुका होऊ शकतो. पण तो होणार कधी ?