साई झुलेलाल यांचा पुतळा उभारण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:36 AM2021-03-07T04:36:46+5:302021-03-07T04:36:46+5:30
उल्हासनगर : शहरातील शांतीनगर प्रवेशद्वार येथे शिवाजी महाराज तर साईबाबा मंदिराजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार येथे डॉ. आंबेडकर यांचा ...
उल्हासनगर : शहरातील शांतीनगर प्रवेशद्वार येथे शिवाजी महाराज तर साईबाबा मंदिराजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार येथे डॉ. आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याबाबत महापौर, उपमहापौर यांनी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुतळा उभारण्याचे आदेश दिले. त्या पाठोपाठ सिंधी बहुल शहरातील पूर्वेच्या झुलेलाल प्रवेशद्वार येथे साई झुलेलाल यांचा पुतळा उभारण्याची मागणी केली आहे.
महापौर लिलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव यांनी गेल्या महिन्यात महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शांतीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार येथे शिवाजी महाराज व साईबाबा मंदिर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याबाबत बैठक घेऊन तसे आदेश प्रशासनाला दिले. तसेच महापालिका निवडणुकीपूर्वी दोन्ही ठिकाणी पुतळ्याचे काम पूर्ण होणार असल्याची प्रतिक्रिया उपमहापौर भालेराव यांनी दिली.
सिंधी समाजाचे दैवत असलेल्या साई झुलेलाल यांचा पूर्णाकृती पुतळा पूर्वेतील जय झुलेलाल प्रवेशद्वार येथे बसविण्याची मागणी मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी महापालिकेकडे केली आहे. तसेच महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते किशोर वनवारी, स्थायी समिती सभापती विजय पाटील, सभागृह नेते भरत गंगोत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. महापालिकेत ७८ पैकी ३२ पेक्षा जास्त सिंधी समाजाचे नगरसेवक असताना त्यांच्याकडून पुतळ्याची मागणी का झाली नाही? असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. दरम्यान, महापालिका प्रांगणात महात्मा फुले, अण्णा भाऊ साठे व साई झुलेलाल यांचा पुतळा उभारण्याची मागणी जुनी आहे. यानिमित्ताने तिन्ही पुतळे उभारण्याची मागणी जोर पकडत आहे.