भिवंडीतील अंजुर फाटा चौकात छत्रपती शिवरायांचे स्मारक उभारण्याची मागणी
By नितीन पंडित | Published: February 14, 2024 04:55 PM2024-02-14T16:55:23+5:302024-02-14T16:55:49+5:30
अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा समन्वयक सुनील भगत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
भिवंडी: राज्याचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्णकृती पुतळ्यासह भव्य स्मारक भिवंडीतील अंजुर फाटा चौकात उभारण्यात यावा अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा समन्वयक सुनील भगत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
भिवंडी शहरासह ग्रामीण भागाला छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा लाभला असून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथेच छत्रपती शिवरायांचा एकमेव पूर्णकृती पुतळा बसवण्यात आला आहे. मात्र अंजुर फाटा चौक हा ग्रामीण भागाशी जोडलेला चौक असून अंजुर फाटा चौकातून भिवंडी,ठाणे, कल्याण,वसई व भिवंडी रेल्वे स्थानकाकडे जाणारा हा मुख्य चौक आहे. या ठिकाणी महापालिकेची जुना जकात नाका ठिकाणी मोकळी जागा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून मनपाच्या या मोकळ्या जागेत छत्रपती शिवरायांचा पूर्णकृती पुतळा व भव्य स्मारक बांधण्यात यावे जेणेकरून शहरातील व तालुक्यातील भावी पिढीला या स्मारकातून प्रेरणा मिळेल अशी मागणी भगत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे.
तसेच अंजुर फाटा या चौकाचे नामकरण देखील छत्रपती शिवाजी महाराज चौक असे करण्यात यावे अशी मागणी देखील सुनील भगत यांनी शासनासह स्थानिक राहनाळ ग्राम पंचायतीकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.