महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ग्राहकांकरिता अभय योजना लागू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:44 AM2021-08-28T04:44:34+5:302021-08-28T04:44:34+5:30
अंबरनाथ : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या काळात अनेकांनी आपला रोजगार गमावल्याने पाणी बिल भरलेले नाही. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ...
अंबरनाथ : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या काळात अनेकांनी आपला रोजगार गमावल्याने पाणी बिल भरलेले नाही. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ग्राहकांकरिता अभय योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी केली आहे. लवकरच अभय योजना लागू करण्यात येईल, असे आश्वासन पाटील यांनी दिले.
अंबरनाथ शहराकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. अंबरनाथमधील प्राधिकरणाचे ग्राहक मोठ्या प्रमाणावर गोरगरीब व कष्टकरी आहेत. कोरोना विषाणूच्या प्रकोपामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकजण नोकरीच्या शोधात आहेत. तुटपुंज्या उत्पन्नातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. यामुळे काही ग्राहकांना पाणी बिल भरणे शक्य झालेले नाही. अशा ग्राहकांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे प्राधिकरणाच्या ग्राहकांकरिता अभय योजना लागू केल्यास मोठ्या प्रमाणावर थकबाकी वसूल होण्यास मदत होईल, असे आ. डॉ. किणीकर यांनी त्यांच्या पत्रात नमूद केले.
यापूर्वी डॉ. किणीकर यांच्या पाठपुराव्यामुळे २०१४-१५ मध्ये अभय योजना लागू करण्यात आली होती. यामुळे प्राधिकरणाच्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास डॉ. किणीकर यांनी व्यक्त केला.
------------फोटो
...........
वाचली