मुरबाड रोडमार्गे कल्याण मेट्रोचा मार्ग वळवावा, भाजपचे खासदार कपिल पाटील यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 08:40 PM2018-04-20T20:40:14+5:302018-04-20T20:40:14+5:30
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोचा मार्ग सहजानंद चौकाऐवजी दुर्गाडी किल्ला, खडकपाडा, मुरबाड रोड मार्गे एपीएमएसी असा वळवावा, अशी आग्रही मागणी भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी आज केली.
कल्याण - ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोचा मार्ग सहजानंद चौकाऐवजी दुर्गाडी किल्ला, खडकपाडा, मुरबाड रोड मार्गे एपीएमएसी असा वळवावा, अशी आग्रही मागणी भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी आज केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रेल्वेबाबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आज महत्वाची बैठक झाली. या बैठकीला पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, आमदार महेश चौघुले, रुपेश म्हात्रे, भिवंडीचे महापौर जावेद दळवी, उपमहापौर मनोज काटेकर आदी उपस्थित होते. त्यावेळी खासदार पाटील यांनी कल्याण मेट्रोचा मार्ग वळविण्याची आग्रही मागणी केली.
कल्याण शहराचा विस्तार होत असून, खडकपाडा व मुरबाड रस्त्यावर हजारो नागरीक राहत आहेत. सद्यस्थितीत कल्याण मेट्रो दुर्गाडीहून सहजानंद चौकातून थेट एपीएमसीत जाणार आहे. त्यामुळे या मेट्रोचा नवे कल्याण मानल्या जाणाऱ्या भागातील हजारो नागरिकांना फायदा होणार नाही. त्यामुळे सहजानंद चौकाऐवजी खडकपाडा, मुरबाड रोडमार्गे एपीएमसीमध्ये मेट्रोचा मार्ग वळविल्यास हजारो प्रवाशांचा फायदा होईल. त्यामुळे मेट्रोचा मार्ग बदलावा, अशी आग्रही मागणी खासदार पाटील यांनी केली. नव्या मार्गामुळे कल्याण शहरातील वाहतूककोंडीतूनही दिलासा मिळू शकेल, याकडे खासदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोच्या मार्गात हजारो रहिवाशी विस्थापित होत आहेत. त्यात काही घरे 100 वर्षांहूनही अधीक जुनी आहेत. त्यामुळे या विस्थापितांचे योग्य पुनर्वसन करावे, अशी मागणीही खासदार पाटील यांनी केली. भिवंडीतून जाणाऱ्या मेट्रोच्या मार्गामुळे कल्याण रोडवरील दुकानदार व रहिवाशी विस्थापित होणार आहेत. त्यांना न्याय देण्याचा आग्रह खासदार पाटील यांनी धरला.