शहरवासियांसाठी लाईव्ह महासभेची मागणी, उल्हासनगरात महापौर-उपमहापौर आमने-सामने
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 04:54 PM2021-05-05T16:54:10+5:302021-05-05T16:55:58+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव दरम्यान महापालिकेने राबविलेल्या उपक्रमाची शहरवासीयांना माहिती होण्यासाठी उपमहापौर भगवान भालेराव यांच्यासह भाजपच्या २० नगरसेवकांनी लेखी निवेदन देऊन विशेष लाईव्ह महासभेची मागणी केली.
- सदानंद नाईक
उल्हासनगर - कोरोनाचा प्रादुर्भाव दरम्यान महापालिकेने राबविलेल्या उपक्रमाची शहरवासीयांना माहिती होण्यासाठी उपमहापौर भगवान भालेराव यांच्यासह भाजपच्या २० नगरसेवकांनी लेखी निवेदन देऊन विशेष लाईव्ह महासभेची मागणी केली. याप्रकाराने महापौर लिलाबाई अशान व उपमहापौर भगवान भालेराव आमने-सामने आल्याचे बोलले जात आहे.
उल्हासनगरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. याचे सर्व श्रेय महापौर लिलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, उपायुक्त मदन सोंडे, वैधकीय अधिकारी डॉ दिलीप पगारे, डॉ राजा रिजवानी आदींना जाते. शहरात कोरोना रुग्णाची संख्या वाढत असतांना आयुक्त डॉ राजा दयानिधी सुट्टीवर गेल्याने, त्यांच्यावर शहरातून टीका झाली. सुट्टीवरून महापालिका सेवेत रुजू होत नाहीतर, तोच आयुक्तांना कोरोनाचा संसर्ग झाला. अखेर आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार भिवंडी महापालिकेच्या आयुक्तांकडे दिला होता. याप्रकाराने आयुक्त डॉ राजा दयानिधी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्हे उभे ठाकून त्यांच्या बदलीची चर्चा सुरू झाली.
महापालिका सत्ताधारी शिवसेना आघाडीतील रिपाईचे शहराध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव यांनी महापालिका स्थायी समिती सभापतींच्या निवडणूकी दरम्यान भाजपा गोटात उडी घेतली. भालेराव यांच्यामुळे भाजपची शक्ती वाढली असून सत्ताधारी शिवसेना आघाडीची डोकेदुखी झाली. वाढत्या कोरोना प्रदूर्भावाला व महापालिकेत चाललेल्या सावळागोंधळाला जबाबदार दाखविण्यासाठी उपमहापौर भालेराव यांच्यासह भाजपच्या २० नगरसेवकांनी महापौर, आयुक्त व महापालिका सचिव याना लेखी निवेदन देऊन ऑनलाइन महासभा लाईव्ह घेण्याची मागणी केली. याप्रकाराने शिवसेना गोटात हलचल होऊन, दोन दिवसापूर्वी महापौरांनी आयुक्तांच्या उपस्थित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. एकूणच श्रेयाची लढाईसाठी महापौर-उपमहापौर आमने-सामने आल्याचे बोलले जात आहे.
उपमहापौर भालेराव यांचा पाहणी दौरा
उपमहापौर भगवान भालेराव यांनी लसीकरण मोहीम राबविणे साठी लसीकरण केंद्राला भेट देणे, ऑक्सिजन साठ्याचा आढावा घेणे, तसेच शांतीनगर येथील स्मशानभूमीत डिझेल शववाहिनी देण्यासाठी पुढाकार घेणे. आदी कामे केल्याची माहिती दिली. एकूणच शहर विकास कामे व श्रेयासाठी महापौर-उपमहापौर आमने-सामने उभे टाकल्याचे चित्र शहरात निर्माण झाले.