मांगरुळमधील झाडांना आग लावणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याची खासदार श्रीकांत शिंदेंची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2017 05:26 PM2017-12-23T17:26:26+5:302017-12-23T17:33:11+5:30
मांगरुळ येथे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी लोकसहभागातून लावलेल्या १ लाख रोपांना काही विघ्नसंतोषी लोकांनी लावलेल्या आगी प्रकरणी सखोल चौकशी करण्यात येऊन दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी,अशी मागणी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी येथे केली.
अंबरनाथ - मांगरुळ येथे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी लोकसहभागातून लावलेल्या १ लाख रोपांना काही विघ्नसंतोषी लोकांनी लावलेल्या आगी प्रकरणी सखोल चौकशी करण्यात येऊन दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी,अशी मागणी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी येथे केली. आग प्रकरणी झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. यावेळी पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी यांच्यासमवेत दौरा करून दोषींचा तातडीने तपास करावा, अशी मागणी शिंदे यांनी केली. यावेळी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, नगरसेवक विश्वनाथ राणे, दीपेश म्हात्रे, चैनु जाधव, उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, पोलीस उपनिरीक्षक श्री. दिघे, विभागप्रमुख अमोल पाटील उपस्थित होते.
जवळपास २० हजार झाडांना याची झळ पोहोचली असली तरीही तात्काळ पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आल्यामुळे झाडांना कमी हानी पोहोचली असून त्यांना नवी पालवी फुटत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. किती झाडांचे प्रत्यक्ष नुकसान झाले आहे हे साधारण आठ दिवसात कळेल, त्यानुसार त्या ठिकाणी नवीन रोप लावण्याच्या सूचना त्यांनी वनविभागाला केल्या. भविष्यात अशातर्हेच्या घटना टाळण्यासाठी डोंगराच्या वरच्या भागात चेकपोस्ट निर्माण कारण्यात यावे, असे शिंदे म्हणाले.
ही केवळ एखाद्या खासदार किंवा लोकप्रतिनिधीने लावलेली झाडे नसून २५ हजार लोकांनी एकत्र येऊन लोकसहभागातून केलेली कामगिरी आहे. त्यामुळे अशातर्हेचे प्रकार हे संताजनक असून याप्रकरणी दोषी असलेल्यांचा तातडीने तपास करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी जेणेकरून अशा समाजविघातक कामांना आळा बसेल, असे शिंदे म्हणाले.
मांगरुळ येथील वनविभागाच्या जागेवर ५ जुलै रोजी विविध अध्यात्मिक, सामाजिक संस्था, शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नागरिक अशा जवळपास २५ हजार नागरिकांनी लोकसहभागातून १ लाख झाडे याठिकाणी लावली होती. या मोहिमेत वन विभाग, कलेक्टर यांनी देखील सहभाग घेतला होता. एकीकडे प्रदूषणाची समस्या गंभीर होत असताना अशातर्हेने वनसंपदा नष्ट करण्याचे होत असलेले प्रकार संतापजनक आहेत मात्र, अशा समाजकंटकांनी कितीही प्रयत्न करोत या झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी आम्ही शेवटपर्यंत पार पडणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.