वन रूपी क्लिनिक सुरू करण्याची मागणी; मनसेच्या माजी नगरसेवकाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:55 AM2019-07-27T00:55:52+5:302019-07-27T00:56:10+5:30
माजी नगरसेवकाचे आयुक्तांना निवेदन : हरकिसनदास रुग्णालयाचा दिला प्रस्ताव
कल्याण : पूर्वेतील केडीएमसीच्या हरकिसनदास रुग्णालयात वन रूपी क्लिनिक सुरू करा, अशी मागणी मनसेचे माजी नगरसेवक नितीन निकम यांनी आयुक्त गोविंद बोडके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आयुक्तांनी निवेदन स्वीकारून ही सेवा सुरू करण्याबाबत त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
हरकिसनदास रुग्णालय शहराच्या पूर्वेला स्टेशनजवळील गणेशवाडीत आहे. या रुग्णालयाच्या इमारतीत सात गाळे वापराविना पडून आहे. तेथे २४ तास चालणारे जेनरिक मेडिकल स्टोअर्स, सोनोग्राफी, डायलिसिस सेंटर, रक्तपेढी, एक्सरे आणि प्रसूतिगृह सुरू करता येऊ शकतो, याकडे निकम यांनी लक्ष वेधले आहे. रेल्वेस्थानकाप्रमाणे पूर्वेतील हरकिसनदास रुग्णालयात वन रूपी क्लिनिक सुरू करण्याच्या मागणीसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची निकम यांनी भेट घेतली होती. तसेच भाजपच्या नगरसेविका सुमन निकम यांनीही यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. वन रूपी क्लिनिकच्या प्रमुखासोबत चर्चा केल्यावर आयुक्तांनी जागेची पाहणी केली होती.
दरम्यान, महापालिकेच्या कल्याण पश्चिमेतील रुक्मिणीबाई रुग्णालय आणि डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर रुग्णालयात योग्य प्रकारे आरोग्यसेवा मिळत नाही, अशी नागरिकांची ओरड असते. नगरसेवकांनीही त्याला दुजोरा दिला आहे. तर, हरकिसनदास रुग्णालय वरील दोन रुग्णालयांपेक्षा लहान आहे. डोंबिवलीतील सूतिकागृहाची नवी इमारत बांधणे प्रस्तावित आहे.
शास्त्रीनगर रुग्णालयात विविध व अद्ययावत वैद्यकीय सेवा देण्यासाठी पीपी तत्त्वावर क्रेष्णा कंपनीला काम दिले आहे. केंद्र सरकारने ठरवलेल्या दरानुसार ही कंपनी रुग्णांना आजाराच्या निदानाच्या सेवा पुरविणार आहे. त्याचे काम प्रगतीपथावर आहे. ‘रुक्मिणीबाई’मध्येही पीपी तत्त्वावर सेवा सुरू करणे प्रस्तावित आहे. तसा प्रस्ताव हरकिसनदास रुग्णालयासाठी देखील केला जावा, अशी अपेक्षाही निकम यांनी व्यक्त केली आहे. मात्र, त्याआधी तेथे ‘वन रूपी’ सुरू करण्याची त्यांची मागणी आहे.