कर्मचाऱ्यांना पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी
By admin | Published: February 1, 2016 01:14 AM2016-02-01T01:14:09+5:302016-02-01T01:14:09+5:30
विविध ठिकाणी कारवाई करण्यास गेल्यावर मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण होते. अशा घटनेमुळे कर्मचाऱ्यांच्या जीवास धोका निर्माण झाला असून, त्यांच्यात संताप व्यक्त होत आहे
भिवंडी : विविध ठिकाणी कारवाई करण्यास गेल्यावर मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण होते. अशा घटनेमुळे कर्मचाऱ्यांच्या जीवास धोका निर्माण झाला असून, त्यांच्यात संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे मनपाकडून होणाऱ्या प्रत्येक कारवाईच्या वेळी कर्मचाऱ्यांबरोबर पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी मनपा कर्मचारी संघटनेने केली आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना परिसरातील नागरिकांचा जमाव जमा होतो. त्यामधून काही अनुचित घटना घडण्याचा संभव असतो. तसेच रस्त्यावरील अतिक्रमण हटविताना तीनबत्ती व बागे फिरदोस येथे अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हल्ला झाला. वास्तविक, रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाल्यांकडून मार्केट विभागातील फी वसुली ठेकेदार दररोज पावती फाडतात. ती केवळ एक दिवसासाठी असते. स्थानिक व बाहेरून आलेल्या फेरीवाल्यांकडून शहरात झालेला कचरा उचलण्यासाठी ही वसुली केली जाते. मात्र, काही राजकीय पुढाऱ्यांनी पावती म्हणजे रस्त्यावर बसण्याचा परवाना दिल्याचा गैरसमज फेरीवाल्यांमध्ये पसरवला आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला होण्याच्या घटनांत वाढ होत आहे. अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमण अथवा अनधिकृत बांधकाम हटविताना तांत्रिक अधिकारी, शहर विकासप्रमुख तसेच उपायुक्त (अतिक्रमण) यांनी घटनास्थळी उपस्थित राहणे अपेक्षित आहे. शहरात जागोजागी मनपाचे काही प्लंबर अनधिकृत जोडणी करीत आहेत. अशी जोडणी केलेल्या नागरिकांचे नळ तोडण्यास गेले असता विरोध होतो. (प्रतिनिधी)