अधिकाऱ्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी
By admin | Published: January 11, 2017 07:06 AM2017-01-11T07:06:01+5:302017-01-11T07:06:01+5:30
माणगाव येथील शेतकरी रमेश भोईर यांनी केलेल्या बेकायदा इमारतीवर कारवाई टाळण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे (एमएमआरडीए) कल्याण विभागातील सहायक नियंत्रक मु.रा. पवार
डोंबिवली : माणगाव येथील शेतकरी रमेश भोईर यांनी केलेल्या बेकायदा इमारतीवर कारवाई टाळण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे (एमएमआरडीए) कल्याण विभागातील सहायक नियंत्रक मु.रा. पवार यांनी पैशांची मागणी केली होती. मात्र, ती पूर्ण न करू शकल्याने त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यामुळे पवार हेच भोईर यांच्या मृत्यूस जबाबदार असून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन संघर्ष समितीने मानपाडा पोलीस ठाण्यास दिले आहे. दरम्यान, पवार यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
माणगाव येथील सर्व्हे नं. ६६, हिस्सा नंबर १ या जमिनीवर भोईर यांनी एक इमारत बांधली. परंतु, हे बांधकाम बेकायदा असल्याची नोटीस २६ डिसेंबर २०१६ ला पवार यांनी भोईर यांना पाठवली. भोईर यांनी बांधकाम करताना ग्रा.पं.कडून सर्व परवानग्या घेतल्या होत्या. तसेच ती स्वत:च्या जागेवर बांधली होती. मात्र, ते बांधकाम एमएमआरडीएने बेकायदा ठरवले. तसेच त्या वेळी कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना आ. सुभाष भोईर व सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार विरोध करू न कारवाई पुढे ढकलली. तसेच एमएमआरडीए अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शेतकरी यांची संयुक्त बैठक होईल. त्यानंतर, पुढील निर्णय होईपर्यंत बांधकाम तोडू नये, अशी मागणी केली. मात्र, पुन्हा २ जानेवारीला एमएमआरडीएने नोटीस बजावून कारवाई करणार असल्याचे सांगितले. पवार यांनी बांधकामावर कारवाई न करण्यासाठी भोईर यांच्याकडे अवास्तव पैशांची मागणी केली. आपण पैसे न दिल्यास इमारत तोडली जाईल, या भीतीने भोईर रात्रभर झोपले नाहीत. त्यात त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे पवार हेच भोईर यांच्या मृत्यूस जबाबदार असून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संघर्ष समितीने केली. (प्रतिनिधी)