श्वान निर्बिजीकरण प्रकल्पामुळे झोपमोड, कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे रहिवाशांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 03:55 AM2017-10-25T03:55:52+5:302017-10-25T03:56:11+5:30
कल्याण : पश्चिमेतील कृषी उत्पन्न बाजार समितीला लागूनच असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या श्वान निर्बिजीकरण प्रकल्पात आणण्यात येणाºया कुत्र्यांच्या भूंकण्यामुळे परिसरातील रहिवाशांची झोपमोड होते.
कल्याण : पश्चिमेतील कृषी उत्पन्न बाजार समितीला लागूनच असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या श्वान निर्बिजीकरण प्रकल्पात आणण्यात येणाºया कुत्र्यांच्या भूंकण्यामुळे परिसरातील रहिवाशांची झोपमोड होते. तसेच प्रकल्पातील दुर्गंधीचा सामनाही त्यांना करावा लागत आहे. त्यामुळे हा प्रकल्प शहरापासून दूर ठिकाणी हलवावा, अशी मागणी त्यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
भटक्या कुत्र्यांच्या गणनेनुसार महापालिका हद्दीत १९ हजार ६ भटके कुत्रे आहेत. या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी मागवलेल्या निवेदाला हैद्राबाद येथील ‘व्हेट्स सोसायटी फॉर अॅनिमल वेल्फेअर अॅण्ड डेव्हलपमेंट’ या संस्थेने प्रतिसाद दिला. ८ जानेवारी २०१५ पासून ही संस्था महापलिका हद्दीतील भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण करत आहे. या कामासाठी संस्थेला निर्बिजीकरणापोटी महापालिकेकडून वर्षाकाठी ८० ते ९० लाख रुपये दिले जातात. आतापर्यंत संस्थेने १६ हजार ५१८ भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले आहे. प्रत्यक्षात २०१२ मधील कुत्र्यांच्या गणणेनुसार अजूनही २ हजार ५९२ भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण बाकी आहे. कंपनीने साधरणत: वर्षाला सरसरी अडीच हजार भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले आहे.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीला लागूनच हा प्रकल्प आहे. निर्बिजीकरणासाठी येथे कुत्रे पकडून आणले जातात. कुत्र्यांचे येथे भुंकणे सुरु असते. रात्रीच्या वेळी त्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रहिवाशांची झोपमोड होते. दुर्गंधीचा त्रासही त्यांना सहन करावा लागतो. श्वान निर्बिजीकरण प्रकल्प येथू हटवून शहराबाहेर न्यावा, अशी मागणी सूर्यमूखी, लोक सुरभी सोसायटीतील सदनिकाधारकांनी एप्रिलमध्ये निविदेद्वारे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्याकडे केली आहे. त्यावर प्रशासनाने अजूनही कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
जनता दरबारातही मुद्दा
सोसायटीमधील रहिवासी हमीद शेख व सल्लाद्दीन खाटीक यांनी हा प्रश्न महापालिकेच्या जनता दरबारातही मांडला होता. त्यालाही प्रशासनाने दाद दिली नाही. या प्रकल्पाचा त्रास या परिसरातील रहेजा कॉम्पलेक्स, लोक उद्यान, शिव समृद्धी, चंद्रमुखी, सर्वोदय या सोसायट्यांमधील रहिवाशांना देखील होत आहे.
श्वान प्रकल्पाच्या दुर्गंधीचा सामाना प्रकल्पाशेजारी असलेल्या बाजार समितीमधील फूल मार्केट, अन्नाधान्य बाजारालाही त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्याचबरोबर कल्याण-शीळ रोडवरून मार्गक्रमण करणारे वाहन चालक व प्रवाशांनाही नाक मुठीत धरून प्रवास करावा लागतो. शहराच्या बाहेर हा प्रकल्प असावा, अशी मागणी रहिवासी वर्गाकडून केली जात आहे.