कल्याण पश्चिम मतदारसंघाची शिवसैनिकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 01:43 AM2019-07-23T01:43:01+5:302019-07-23T01:43:37+5:30

गुरुपौर्णिमेला पालकमंत्र्यांकडे धरला हट्ट : खा. पाटील यांना जागेच्या बोलीवर मदत केल्याची करुन दिली आठवण

Demand for Shiv Senais of Kalyan West constituency | कल्याण पश्चिम मतदारसंघाची शिवसैनिकांची मागणी

कल्याण पश्चिम मतदारसंघाची शिवसैनिकांची मागणी

googlenewsNext

अनिकेत घमंडी 

डोंबिवली : लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांना पाठिंबा देताना कल्याण पश्चिमेची विधानसभेची जागा भाजपने शिवसेनेला सोडावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे आता तो मतदारसंघ सेनेकडे मागून घेण्याची मागणी कल्याण पश्चिमेतील शिवसैनिकांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गुरुपौर्णिमेच्यानिमित्ताने भेट घेतली तेव्हा केली. कल्याण पश्चिमेतून भाजपचे नरेंद्र पवार हे मागीलवेळी विजयी झाल्याने या जागेवरुन युतीत तणाव होण्याची चिन्हे दिसत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्यावेळी कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक भाजप उमेदवार कपिल पाटील यांच्यावर नाराज होते. विधानसभा निवडणुकीत ही जागा शिवसेनेला सोडावी, अशी मागणी त्यावेळी पाटील यांच्याकडे केली होती. पाटील यांच्याबाबत तीव्र नाराजी असतानाही शिवसैनिकांनी त्यांना मदत केली होती. त्यामुळे आता कल्याण पश्चिमची जागा आम्हाला दिल्याचे जाहीर करावे, असा हट्ट कल्याण पश्चिमेतील शिवसैनिकांनी शिंदे यांच्याकडे धरला. त्यामुळे आम्ही शब्द पाळला, आता भाजपनेही तो पाळावा अशा शब्दांत त्यांनी शिंदे यांच्याकडे जागेची मागणी केल्याची माहिती शिवसैनिक व माजी नगरसेवक रवी पाटील यांनी दिली. कल्याण पश्चिमेमध्ये शिवसेनेचे प्राबल्य आहे. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीमध्ये ३८ पैकी २४ नगरसेवक शिवसेना व पुरस्कृत अपक्ष विजयी झाले. उर्वरित ५ भाजपचे आणि ४ मनसेचे नगरसेवक विजयी झाले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत युती नसल्याने शिवसेनेकडून विजय साळवी यांना उमेदवारी देण्यात आली होती. मोदी लाटेत भाजपचे नरेंद्र पवार निवडून आले. आता युतीमध्ये निवडणूक लढणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी रविवारी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेचे प्राबल्य असलेली जागा शिवसेनेला सोडावी, अशी शिवसैनिकांची भावना असल्याचे पाटील म्हणाले. लोकसभा निवडणुकीत खा. पाटील यांच्या प्रचारसभेतच शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली होती. या भूमिकेमुळे युतीत आलबेल नाही हेच स्पष्ट झाले आहे.

ठाण्यातील पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ भाजपचे संदीप लेले मागत आहेत, अंबरनाथची डॉ. बालाजी किणीकर, तसेच कल्याण ग्रामीणचीही शिवसेनेची जागा भाजप कार्यकर्ते मागत आहेत. निवडणुका जवळ आल्या की अशा मागण्या होतातच. युतीचे वरिष्ठ नेते जे ठरवतील ते आपल्याला मान्य असेल. - नरेंद्र पवार, आमदार

Web Title: Demand for Shiv Senais of Kalyan West constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.