भाईंदर येथून चार नवे बस मार्ग सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:46 AM2021-08-20T04:46:36+5:302021-08-20T04:46:36+5:30
मीरारोड : प्रवाशांची संख्या पाहता भाईंदर पूर्वेवरून अंतर्गत रिंगरूट तसेच दादर, ठाणे व अंधेरीपर्यंतच्या चार वेगवेगळ्या मीरा-भाईंदर परिवहन सेवेच्या ...
मीरारोड : प्रवाशांची संख्या पाहता भाईंदर पूर्वेवरून अंतर्गत रिंगरूट तसेच दादर, ठाणे व अंधेरीपर्यंतच्या चार वेगवेगळ्या मीरा-भाईंदर परिवहन सेवेच्या बससेवा सुरू करण्याची मागणी शिवसेना गटनेत्या नीलम ढवण यांनी केली आहे.
भाईंदर पूर्व भागात लोकवस्ती मोठी आहे. परंतु इंद्रलोक, न्यू गोल्डन नेस्ट आदी भागातील नागरिकांना बससेवा नसल्याने त्यांना रिक्षाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे भाईंदर रेल्वेस्थानक पूर्व येथून बाळाराम पाटील मार्ग, गोडदेव, फाटक मार्ग, सावरकर चौक, न्यू गोल्डन नेस्ट, इंद्रलोक, विमल डेरी, नवघर नाका ते भाईंदर स्थानक पूर्व अशी रिंगरुट सेवा सुरू करावी. याशिवाय भाईंदर पूर्व रेल्वे स्थानक ते ठाणे, दादर तसेच महिलांसाठी अंधेरी स्थानक असे बस मार्ग सुरू करावे जेणे करून प्रवाशांना ये-जा करण्यासाठी सुविधा होईल असे ढवण म्हणाल्या. परिवहन सभापती दिलीप जैन व अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे याना त्यांनी तसे निवेदन दिले आहे.