शेती घटल्याने सुपाची मागणी घटली; विक्रेत्या महिलेची खंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 12:42 AM2020-01-12T00:42:59+5:302020-01-12T00:43:19+5:30
आळेफाटा येथील सूर्यवंशी ४० वर्षांपासून सूपविक्रीचा व्यवसात करत आहेत.
पंकज पाटील
मुरबाड : शेतीशी निगडित असलेल्या पारंपरिक सुपांची विक्री मोठ्या प्रमाणात घटली आहे. प्लास्टिकच्या सुपांमुळे पारंपरिक विणीचे सूप नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. शेतकरी आता शेतीसाठी सूप शक्यतो वापरत नाही. केवळ धार्मिक विधीसाठी सुपाचा वापर केला जातो. त्यामुळे आपल्या पारंपरिक व्यवसायावर त्याचा परिणाम होत असल्याची भावना सूपविक्रेत्या चंपा सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.
मुरबाडची म्हसा यात्रा म्हणजे सर्वांचे आकर्षण. या यात्रेत पारंपरिक शेतीशी निगडित अवजारे, जनावरे, टोपली आणि सूप यांची मोठी विक्री होते. म्हसा यात्रेतील टोपली बाजारात गेल्या ४० वर्षांपासून सुपाचा व्यवसाय करणाऱ्या सूर्यवंशी यांनी आपली व्यथा मांडली. टोपलीच्या तुलनेत सुपाची मागणी कमी होत चालली आहे. शेतीचे प्रमाण कमी झाल्याने सुपांच्या विक्रीवर त्याचा परिणाम झाला आहे. काही भागात आजही शेती सुरू आहे, त्यामुळे ते शेतकरी आवर्जून सूप खरेदी करतात. मात्र, जी गावे शहराशी जोडली गेली आहेत, त्या गावात सुपांचे महत्त्व केवळ धार्मिक विधीपुरते मर्यादित राहिले आहे. हळद, लग्नसराई आणि पाचवीपूजन करताना काही ठिकाणी सुपाची गरज भासते. त्यासाठीच वापरले जाते. मात्र, पारंपरिक शेतीशी जोडले गेलेले सूप आता हव्या त्या प्रमाणात विकले जात नाही.
आळेफाटा येथील सूर्यवंशी ४० वर्षांपासून सूपविक्रीचा व्यवसात करत आहेत. पूर्वी १० रुपयांपासून सूप मिळत होते. आज महागाई वाढल्याने त्याच सुपाची किंमत आता २०० ते ३०० च्या घरात गेली आहे. मात्र, बाजारात प्लास्टिकचे सूप अल्प किमतीत मिळत असल्याने ते घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. असे असतानाही मंदीच्या काळातही सूर्यवंशी सुपाचा व्यवसाय करीत आहेत. वर्षभर विविध आठवडाबाजारांत सूपविक्री करून त्या आपल्या संसाराचा गाडा हाकत आहेत. मात्र, म्हसाच्या यात्रेत खºया अर्थाने त्यांना दोन पैशांचा फायदा नक्कीच होतो. मात्र, गेल्या तीन ते चार वर्षांत हा फायदाही कमी होत चालला आहे.
एक सूप विणण्यासाठी दीड तास जातो. मात्र, त्याचा मोबदला म्हणून २०० रुपये देण्यासही ग्राहक तयार होत नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आपली तिसरी पिढी या व्यवसायात असून पुढची पिढी हे काम करेल, असे वाटत नाही. पूर्वीसारखी मागणी नसल्याने आता आमचे नातवंडं या व्यवसायापासून दुरावत आहेत. तसेच या व्यवसायाकडे न वळता शिक्षण घेऊन दुसरा व्यवसाय करावा, असा सल्ला स्वत: सूर्यवंशी देतात.