म्हैसूरपाक, अनारशांसह मिठायांनाही मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 12:21 AM2020-10-09T00:21:57+5:302020-10-09T00:22:01+5:30
अधिक महिन्यात मागणी वाढली; तुपातल्या मिष्टान्नांना जास्त पसंती
ठाणे : अधिक मासात जावयांना गोडधोड खायला घातले जाते. त्यासाठी जाळीदार खाद्यपदार्थ देण्याची पद्धत आहे. त्यामुळे अनारसे, म्हैसूरपाकची मागणी वाढली आहे. हे पदार्थ जावयाला द्यायचे म्हणून शुद्ध तुपातले अनारसे आणि मैसूरपाक खरेदी केले जात असल्याचे निरीक्षण दुकानमालकांनी नोंदविले.
अधिकमासात जावयाला वाण देण्याची प्रथा आहे. विशेषत: नवविवाहितांना भेटवस्तू दिल्या जातात. या महिन्यात जावयांना गोड पदार्थ करून खायला घातले जातात. त्यातही अनारशांचा मोठा मान असतो. हल्ली हे पदार्थ बनविणे अनेकांना शक्य नसल्याने ते उपाहारगृह, मिठाईच्या दुकानांतून किंवा घरगुती आॅर्डर देऊन विकत आणतात. त्यामुळे अधिकमास सुरू झाल्यापासून या पदार्थाला मागणी वाढली आहे. तेलातले ११ नग अनारसे १५० रुपये, तर तुपातले २८५ रुपये, तेलातले ३३ नग अनारसे ४५० रुपये, तर तुपातले ८५० रुपयेप्रमाणे मिळत आहेत. म्हैसूरपाक हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ. हा पदार्थ केव्हाही खाल्ला जातो. परंतु, या महिन्यात त्याला अधिक मागणी असते. तेलातील म्हैसूरपाक ४५० रुपये, तर तुपातील म्हैसूरपाक ६४० रुपये दराप्रमाणे मिळत आहेत.
जावई हा विष्णूसमान असतो. म्हणून, जावयाला ३३ अनारसे दान देण्याची पद्धत पडली आहे. आधुनिक काळात अधिकमासात गरजू गरिबांना ग्रंथदान, अर्थदान, अन्नदान, वस्त्रदान, श्रमदान करावे. सध्या कोरोनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अशांना मदत करावी. रक्तदान करावे. नेत्रदान, अवयवदानाचा संकल्प करावा. हे पुण्यदायी आहे.
- दा.कृ. सोमण, पंचांगकर्ते, खगोलअभ्यासक
यंदा अनारसे आणि म्हैसूरपाकमध्ये १० टक्के दराने वाढ झाली आहे. लॉकडाऊनमुळे खवय्ये ३३ ऐवजी ११ नग अनारसे खरेदी करीत आहेत. - केदार जोशी, दुकानमालक
अनारसे, म्हैसूरपाकप्रमाणे पेढे, बर्फी, श्रीखंड, काजूकतली, बंगाली मिठाई, गुलाबजाम, श्रीखंड या पदार्थांचीही खरेदी केली जात आहे.
अधिकमासात जावयांना चांदीच्या वस्तू दिल्या जातात. त्यात ताट, वाटी, ताम्हण, फुलपात्र, ब्रेसलेट, कडा यांची खरेदी सुरू आहे. पण, यातही चांदीच्या निरांजनला अधिक मागणी आहे, असे सोनेचांदीचे व्यापारी कमलेश जैन यांनी सांगितले.