मोबाइल घेण्यास टाळाटाळ : अधिकारी, कर्मचा-यांची मुजोरी ,हेमा बेलानी यांची कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 01:40 AM2017-10-09T01:40:41+5:302017-10-09T01:41:00+5:30
महापालिकेने सर्वसामान्य नागरिक, लोकप्रतिनिधी आदींच्या सोयीसाठी पालिका अधिकारी व कर्मचाºयांना मोबाइल दिले आहेत. त्याची बिले पालिका भरत असली तरी अधिकारी नागरिकांचे सोडाच, पण लोकप्रतिनिधींचेही फोन घेत नाही.
मीरा रोड : महापालिकेने सर्वसामान्य नागरिक, लोकप्रतिनिधी आदींच्या सोयीसाठी पालिका अधिकारी व कर्मचाºयांना मोबाइल दिले आहेत. त्याची बिले पालिका भरत असली तरी अधिकारी नागरिकांचे सोडाच, पण लोकप्रतिनिधींचेही फोन घेत नाही. यामुळे भाजपा नगरसेविका हेमा बेलानी यांनी महापौर व आयुक्तांकडे कारवाईची मागणी केली आहे.
अनेक मस्तवाल अधिकारी व कर्मचारी मात्र पालिकेने दिलेल्या क्रमांकावर लोकप्रतिनिधी, नागरिक आदींनी फोन केला, तरी उचलत नाहीत. एखाद्या कामात व्यस्त असले तरी समोरून पुन्हा फोन करत नाहीत.
आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी व्हॉट्सअॅपवरून अधिकारी व कर्मचारी यांना सूचना देणे, कामाचा आढावा व छायाचित्रे मागवणे, नागरिक वा लोकप्रतिनिधी यांची बेकायदा बांधकामे, बॅनर आदी अन्य प्रकारच्या तक्रारींवर कारवाईचे निर्देश देणे आदी कामकाज केले जाते.
परंतु, बहुतांश अधिकारी व कर्मचारी मात्र सर्वसामान्य नागरिक तर सोडाच, पण लोकप्रतिनिधींनी व्हॉट्सअॅपवर केलेल्या तक्रारींवर काहीच कारवाई करत नाही. त्यांना फोन केला तर फोन उचलत नाहीत. ‘लोकमत’ने याला वाचा फोडल्यानंतर उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी २८ जून २०१७ मध्ये परिपत्रक काढून सर्व अधिकारी व कर्मचाºयांना महापालिकेने दिलेले मोबाइल २४ तास सुरू ठेवण्याचे आदेश दिले
होते.
नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या तक्रारी घेऊन त्यांचे निवारण करणे व त्यांच्याशी संवाद साधणे इत्यादी कामांसाठी मोबाइलचा वापर करावा. याबाबत, तक्रार आल्यास नियमानुसार कारवाईचा इशारा म्हसाळ यांनी दिला होता. अनेक अधिकारी व कर्मचाºयांची मुजोरी सुरूच असून नवनिर्वाचित नगरसेवकांनासुद्धा याचा कटू अनुभव येऊ लागला आहे.