ट्रेडमार्क, कॉपीराईटचे उल्लंघन करून ऑनलाईन विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 03:24 PM2024-06-16T15:24:08+5:302024-06-16T15:24:50+5:30
गेल्या वर्षी श्री वल्लभ मेटल्स ने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरदेखील सेलो प्लास्टिक इंडस्ट्रियल वर्क ह्या कंपनीने मॅक्स फ्रेश हे नोंदणीकृत ट्रेडमार्क वापरून ऑनलाईन विक्री सुरूच ठेवल्याने कंपनी चालकांवर गुन्हा दाखल करण्याची तक्रार भाईंदरच्या श्री वल्लभ मेटल्स कंपनीच्या वतीने मीरा भाईंदरचे पोलीस उपायुक्त यांच्याकडे केली आहे.
भाईंदर पूर्वेला औद्योगिक वसाहतीत श्री वल्लभ मेटलस् हि कंपनी असून ती पाण्याच्या बाटल्या , टिफिन डबे आदी विविध वस्तूंचे उत्पादन विक्री करते . सदर कंपनीने त्यांचा मॅक्स फ्रेश हा ट्रेडमार्क नोंदणीकृत केलेला आहे . तसे असताना सेलो कंपनीने त्यांचे टिफिन बॉक्स , बाटल्या आदी उत्पादने विकताना मॅक्स फ्रेश हा ब्रँड वापरल्याने त्या विरोधात गेल्या वर्षी श्री वल्लभ मेटल्स ने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
दिल्ली उच्च न्यायालयाने सेलो कंपनीला मॅक्स फ्रेश ह्या ब्रँड नावाचा वापर करून नवीन उत्पादन करण्यास मनाई केली तसेच ३१ मार्च २०२४ पर्यंत त्यांच्या कडील मॅक्स फ्रेश ह्या नावाने असलेला वस्तूंचा साठा संपून टाकावा असे आदेश दिले होते . इतकेच नव्हे तर न्यायमूर्ती संजीव नरूला यांनी सेलो कंपनीचे सीईओ मुकेश कोठारी यांना पुढील सुनावणीच्या तारखेला न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे . तसेच उत्पादन वस्तू , जीएसटी भरणा आदींच्या माहितीसह शपथपत्र सादर करण्यास सांगितले आहे .
दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशा नंतर देखील सेलो कंपनीने मॅक्सफ्रेश ट्रेडमार्कचा बेकायदा वापर सुरूच ठेवत कंपनीच्या संकेतस्थळ , अमेझॉन आदींवर ऑनलाईन वस्तूंची विक्री चालवली आहे . सेलो कंपनीच्या चालकांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संगनमताने कटकारस्थान करून जाणीवपूर्वक आमचा व न्यायालयाचा विश्वासघात करत आमच्या नोंदणीकृत ट्रेडमार्कचा गैरवापर चालवला आहे . आमच्या ट्रेडमार्कचा गैरवापर करून उत्पादन व विक्री करत आहेत . आमची फसववणूक केली आहे . त्यांनी माहिती तंत्रज्ञानचा गैरवापर करत स्वतःची वेबसाईट तसेच अमेझॉन वेबसाईटवर आमच्या ट्रेडमार्क असलेल्या उत्पादनांची ऑनलाईन विक्री चालवली आहे . आमचे आर्थिक नुकसान करत ट्रेडमार्क आणि कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केले असल्याने कंपनीचे मालक प्रदीप जी. राठोड, पंकज जी. राठोड, गौरव पी. राठोड व अमेझॉन कंपनीवर गुन्हा दाखल करावा अशी विनंती वल्लभ मेटल्स कंपनीच्या वतीने लेखी तक्रार मीरा भाईंदर परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्या कडे शनिवार १५ जून रोजी केली आहे .
तक्रार अर्ज सोबत न्यायालयाच्या आदेशाच्या प्रति तसेच सेलो कंपनीने मॅक्सफ्रेश ट्रेडमार्क वापरून उत्पादनांची ऑनलाईन विक्री करत असल्याचे पुरावे पोलीस उपायुक्तांना तक्रारी सोबत दिल्याचे कंपनीच्या वतीने नमूद करण्यात आले आहे .