बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
By धीरज परब | Published: November 4, 2022 03:43 AM2022-11-04T03:43:42+5:302022-11-04T03:45:05+5:30
...अन्यथा मच्छिमार समुद्रात एकजुटीने पर्ससीन नेटच्या बोटी हुसकावून लावतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
मीरारोड - बंदी असूनही संबंधित विभागाच्या आशीर्वादाने पर्ससीन नेट व एलईडी मार्फत बेकायदेशीर मासेमारी सुरू असून त्यांच्या बोटी जप्त करून गुन्हे दाखल करा, अशी मागणी मच्छिमार नेते बर्नड डिमेलो यांनी केली आहे. अन्यथा मच्छिमार समुद्रात एकजुटीने पर्ससीन नेटच्या बोटी हुसकावून लावतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
पर्ससीन नेट व एलईडी द्वारे मासेमारी करण्यास नौकांना ६ फेब्रुवारी २०१६ च्या शासन परिपत्रकानुसर वर्षातील बाराही महिने बंदी घातलेली आहे. तसे असताना देखील रायगड जिल्ह्यातून सुमारे २०० हून अधिक पर्ससीन नेट नौका एल.ई.डी. दिव्यांच्या मदतीने ठाणे - पालघर तसेच मुंबई परिसरातील समुद्रात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मासेमारी करत आहेत.
यामुळे पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या हक्काचे मासे हे पर्ससीन नेट वाले मारत आहेत. इतकेच नव्हे तर पर्ससीन नेट व एलईडी मुळे प्रचंड प्रमाणात लहान मासे व मत्स्यबीज नष्ट होत असल्याने एकूणच मासळीचे अस्तित्व धोक्यात येऊन मत्स्य दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे.
अश्या अवैध मासेमारीमुळे जिल्ह्यातील पारंपरिक मच्छिमार आणि अनधिकृत पर्ससीन नेट मच्छिमार ह्यांच्यात समुद्रात संघर्ष पेटू शकतो यामुळे जीवितहानी, नौकांची हानी देखील होऊ शकते. कायद्याने बंदी असलेल्या मासेमारीला रोखण्यासाठी पर्ससीन नौकंवरील मच्छिमारांवर कारवाई करण्याकरिता महाराष्ट्र पोलीस कायदा, पर्यावरण संरक्षण कायदा तसेच भारतीय दंड साहिता नुसार अवैध मासेमारी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती चे कार्याध्यक्ष बर्नड डिमेलो यांनी केली आहे.