उल्हासनगरचे नामकरण सिंधुनगर करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 03:38 AM2019-03-22T03:38:57+5:302019-03-22T03:39:14+5:30

ऐन लोकसभा निवडणुकीत उल्हासनगरचे सिंधुनगर नामकरण करण्याची मागणी होत असल्याने मराठी व सिंधी वाद पेटण्याची शक्यता होत असून शिवसेना कोंडीत सापडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

The demand for Ulhasnagar named Sindhunagar | उल्हासनगरचे नामकरण सिंधुनगर करण्याची मागणी

उल्हासनगरचे नामकरण सिंधुनगर करण्याची मागणी

Next

- सदानंद नाईक
उल्हासनगर - ऐन लोकसभा निवडणुकीत उल्हासनगरचे सिंधुनगर नामकरण करण्याची मागणी होत असल्याने मराठी व सिंधी वाद पेटण्याची शक्यता होत असून शिवसेना कोंडीत सापडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यापूर्वीही अशीच मागणी करण्यात आली होती.
उल्हासनगर महापालिकेवर भाजपा-ओमी टीम व साई पक्षाची सत्ता आहे. शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी, पीआरपी, रिपाइं व भारिप पक्ष विरोधी बाकावर आहे; मात्र लोकसभेत भाजपा-शिवसेनेची युती झाल्याने त्यांचे पदाधिकारी, नगरसेवक गळ्यात गळा घालून फिरत आहेत. या प्रकाराने भाजपासोबत सत्तेत असलेल्या ओमी कलानी टीमची कोंडी झाली. त्यानंतर युतीचे संभाव्य उमेदवार, खासदार श्रीकांत शिंदे यांनी ओमी कलानी टीमकडे मदतीचा हात मागितला. त्यांनी कलानी महलमध्ये लवाजम्यासह जाऊन कलानी कुटुंबाने केलेल्या कामाचे कौतुकही केले. दरम्यान, युतीच्या शिवसेना उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या आड उल्हासनगरचे नामकरण करण्याची मागणी पुढे आली.
कलानी महल येथे श्रीकांत शिंदे यांनी ओमी टीमसोबत चर्चा केली, त्यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कलानी महलमध्ये यायला हवे होते, असे मत टीमच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. व्यापारी, ओमी टीम व भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी शिंदे यांना पाठिंबा देण्याच्या आड उल्हासनगरचे सिंधुनगर असे नामकरण करण्याची मागणी केली आहे. ही मागणी जुनीच असून बहुसंख्य सिंधी समाज आजही उल्हासनगरऐवजी सिंधुनगरच्या नावाचा वापर करतात. या प्रकाराने शहरात वेगळ्याच चर्चेला उधाण आले. मराठी नागरिकांत यामुळे संताप व्यक्त होत आहे. ओमी कलानी व श्रीकांत शिंदे यांच्यात चर्चा होऊनही ओमी टीमने पाठिंब्याबाबत मुख्यमंत्री व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या आदेशाची अट घातली. आता सिंधुनगरची मागणी पुढे आल्याने शिवसेना कोंडीत सापडून मराठी मतदार संभ्रमित झाला आहे.

७० वर्षांपूर्वीची मागणी
फाळणीच्या वेळी पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील सिंधी समाजासह इतर समाजाला देशाच्या विविध भागांत वसवण्यात आले. काहींना कल्याण शहराजवळील ब्रिटिशकालीन लष्करी छावणीतील खुली जागा व बॅरेकमध्ये वसवण्यात आले. लष्करी छावणीच्या जागेत वसवलेल्या वस्तीला उल्हास नदीवरून उल्हासनगर नाव देण्यात आले. मात्र, सिंधी समाजाचा याला विरोध होता. त्यांनी सिंधुनगर नाव देण्याची मागणी केली होती. आजही ही मागणी वेळोवेळी होत आहे.

Web Title: The demand for Ulhasnagar named Sindhunagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.