ठाण्यातील ‘त्या’ तरुणीला उपचारासाठी नकार देणाऱ्या डॉक्टरविरुद्ध कारवाईची मागणी
By जितेंद्र कालेकर | Published: January 9, 2020 10:22 PM2020-01-09T22:22:05+5:302020-01-09T22:58:26+5:30
ठाण्यात रहेजा कॉम्पलेक्ससमोरील पादचारी पूलावरुन उडी घेत आत्महत्या करणाºया त्या तरुणीच्या नातेवाईकांचा अद्यापही शोध लागलेला नाही. मात्र, या प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. गंभीर अवस्थेमध्ये कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेल्यानंतर तिला दाखल करण्यास नकार देणाºया संबंधित डॉक्टरांवर कडक कारवाईची मागणी सामाजिक संघटनेने केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यातील एलबीएस मार्गावरील पादचारी पुलावरून उडी घेऊन एका २२ वर्षीय तरुणीने एक आठवडयापूर्वी उडी घेऊन आत्महत्या केली. तिने उडी घेतल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेमध्ये तिला ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, या रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तिला दाखल करुन घेतले नव्हते. याप्रकरणी ठाण्यातील मानव अधिकार एवं भ्रष्टाचार उन्मूलन या संस्थेच्या वतीने ठाण्याचे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे.
या २० ते २२ वर्षीय अनोळखी तरुणीने वागळे इस्टेट येथील लाल बहाद्दूर शास्त्री मार्गावरील रहेजा कॉम्प्लेक्ससमोरील पादचारी पूलावरून १ जानेवारी २०२० रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ती खाली कोसळल्यानंतर तिच्या पोटाला, छातीला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला एका रिक्षाचालकाने तातडीने काही नागरिकांच्या मदतीने जवळच्याच हायवे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तसेच सिटी स्कॅनची गरज असल्यामुळे कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता. तिला घेऊन वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक पांडुरंग झोडगे आणि तात्यासाहेब बल्लाळ हे छत्रपती शिवाजी रुग्णालयात गेले. मात्र, रुग्णवाहिकेमध्ये असलेल्या या जखमी तरुणीला पाहण्यासाठी डॉक्टर बाहेरही आले नाही. शिवाय, वागळे इस्टेट आमच्या हद्दीत येत नाही, असे सांगून तिला रुग्णालयात दाखल करण्यासही तेथील डॉक्टरांनी नकार दिला. अखेर, पोलीस उपनिरीक्षक अश्विनी जाधव यांनी तिला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. याबाबतचे सविस्तर वृत्तही लोकमतच्या ३ जानेवारी २०२० रोजीच्या अंकामध्ये ‘ठाण्यात पादचारी पुलावरुन उडी घेत तरुणीची आत्महत्या’ ‘नातेवाईकांचा शोध सुरु: दाखल करुन घेण्यास रुग्णालयाचा नकार’ या मथळयाखाली वृत्तही प्रसिद्ध केले होते. याच वृत्ताची मानव अधिकार एवं भ्रष्टाचार उन्मूलन संघ या संस्थेने गंभीर दखल घेतली असून संस्थेचे अध्यक्ष डॉ. बिनू वर्गीस यांनी अशा प्रकारे रुग्णालयात गंभीर अवस्थेतील तरुणीला दाखल करुन घेण्यास नकार देणा-या संबंधित डॉक्टरांवर कडक कारवाईची मागणी पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे तसेच ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल आणि ठाणेनगर पोलीस ठाण्याकडे केली आहे. जर एखाद्या डॉक्टरवर रुग्णाच्या नातेवाईकांनी हल्ला केला तर डॉक्टरांच्या संघटनांकडून बंदचे हत्यार उपसले जाते. आंदोलनेही केली जातात. मग, गंभीर अवस्थेतील रुग्ण तरुणीला दाखल करुन न घेण्याचा अक्षम्य हलगर्जीपणा करणाºया संबंधित डॉक्टरांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, असेही डॉ. वर्गीस यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, या तरुणीच्या नातेवाईकांचा अद्यापही शोध लागलेला नसून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘‘ गंभीर अवस्थेतील तरुणीला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दाखल करुन न घेतल्याची तक्रार सामाजिक संघटनेने केली आहे. याबाबत चौकशी सुरु करण्यात आली आहे. त्याचा अहवाल लवकरच ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे देण्यात येणार आहे. ’’
सुभाष बुरसे, पोलीस उपायुक्त, ठाणे शहर