जिल्ह्यातील पाच तालुक्यांत ‘डेमो हाउस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:40 AM2021-03-18T04:40:22+5:302021-03-18T04:40:22+5:30
ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास व राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या घरकुलांच्या कामाचा दर्जा उच्च प्रतीचा राहावा ...
ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास व राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या घरकुलांच्या कामाचा दर्जा उच्च प्रतीचा राहावा याकरिता पाच तालुक्यांमध्ये डेमो हाउस उभारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा विकास यंत्रणा विभागाकडून देण्यात आली.
ही डेमो हाउस बांधताना घरांचे डिझाइन टायपोलॉजीज असावे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला असावा, बांधकाम खर्च कमी असावा, नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी घरे सक्षम असावीत, बांधकाम उच्च प्रतीचे व पर्यावरणपूरक असावे.
केंद्र शासनाने ‘सर्वांसाठी घरे-२०२२’ हे धोरण जाहीर केले असून, राज्यातील ग्रामीण भागामध्ये बेघर घटकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण व इतर राज्य पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे व त्यामध्ये गुणवत्ता आणण्यासाठी महाराष्ट्रात २० नोव्हेंबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत महाआवास अभियान राबविण्यात येत आहे.
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, मुरबाड व शहापूर तालुक्यामध्ये डेमो हाउस प्रस्तावांना तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. या डेमो हाउसचे काम सुरू करण्यात आले असून, अभियान कालावधीमध्ये सर्व डेमो हाउस पूर्ण करण्याचे निर्देश जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिले आहेत.
कशी असतील डेमो हाउस?
लाभार्थ्यांना घरे देताना सूर्यप्रकाश, हवा खेळती राहणे, घरांच्या कामातील सफाई यांचा विचार केला जाणार आहे. दारे, खिडक्या मजबूत व उत्तम दर्जाची असतील. स्थानिक भौगोलिक परिस्थितीला अनुकूल घरे बांधण्यात येतील. लाभार्थ्यांमध्ये योजनेतील सहभागाचा उत्साह वाढवणारी ही घरे असतील.
........
वाचली.