कोरोना काळात हरवली लोकशाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:45 AM2021-09-05T04:45:37+5:302021-09-05T04:45:37+5:30
अनिकेत घमंडी लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कोरोना काळात सगळे काही ठप्प झाले होते, आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येण्याची ...
अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कोरोना काळात सगळे काही ठप्प झाले होते, आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येण्याची चिन्हे असली तरी प्रशासनाला काय वाटते हे महत्त्वाचे आहे. त्यांना वाटत असेल तरच सगळे ठिकठाक होईल, अन्यथा सामान्य नागरिकांना कुणी वाली नाही. म्हणूनच कोरोना काळात लोकशाही हरवली असून ती कुणी शोधून देता का? अशी टीका ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व संरक्षण विभागातील निवृत्त अधिकारी विवेक पंडित यांनी केली. देशाच्या स्वातंत्र्याला ७४ वर्षे पूर्ण झाली असून, मार्च २०२० पासून लोकशाही हरवली असल्याचे फलक त्यांनी विद्यानिकेतन शाळेच्या बसच्या मागे लावले आहेत.
रस्त्यावर खड्डे पडले आहेत, त्याबाबत कुठे काही काम सुरू असेल, तर त्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली तर ते देखील ‘म्युनिसिपल ऑफिस में जाके पुछो,’ असे उत्तर देऊन सामान्यांना बेदखल करीत आहेत. कोपर उड्डाणपुलासंदर्भातदेखील कुणी कॉन्ट्रॅक्टर देता का कॉन्ट्रॅक्टर, असा सवाल केल्यावर यंत्रणा जागी झाली, हे सगळ्यांना माहीत आहे. पण असे किती ठिकाणी जनजागरण करायचे? आणि का? असा सवाल त्यांनी केला. सध्या तर इथले आपण निवडून दिलेले मनपाचे विश्वस्त म्हणजेच नगरसेवक यांचा कालावधी संपल्याने त्यांनाही धड जबाबदार धरता येत नसल्याने, थेट प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.
शिक्षणाचा बट्ट्याबोळ, लसीकरण केंद्रावर सावळागोंधळ
काहीही सुरळीत नाही, याच दुःख असल्याचे पंडित सांगतात. कारण रस्ते धड नाहीत, वीज सतत कुठे ना कुठे खंडित होतच आहे. वाहतूककोंडीवर बोलायचे कुणी? कोपर उड्डाणपूल शुभारंभ भिजत घोंगडे, रेल्वेसेवा सगळ्यांना नाहीच, कोरोना लसीकरण केंद्रावर सावळागोंधळ, अधिकारी ऑनफिल्ड नाहीत, शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालेला असताना केवळ सगळे ठीक सुरू आहे, असे म्हणायचे का? आणि म्हणायचे तरी का? म्हणूनच लोकशाही हरवली आहे, असे म्हंटले तर त्यात वावगे काय, असा सवाल त्यांनी केला.
----------------