उल्हासनगरात रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या तब्बल ४० दुकानावर पाडकाम कारवाई!
By सदानंद नाईक | Published: January 18, 2023 06:54 PM2023-01-18T18:54:25+5:302023-01-18T18:55:04+5:30
पाडकाम कारवाई दरम्यान कोणतीही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
उल्हासनगर : महापालिका प्रभाग समिती क्रं-१ व ४ कार्यक्षेत्रातील रस्त्याला अडथळा ठरलेल्या तब्बल ४० दुकानावर बुधवारी पोलीस बंदोबस्तात पाडकाम कारवाई करण्यात आली. अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी व सहायक आयुक्त अजित गोवारी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.
उल्हासनगर कॅम्प नं-१, भाजी मार्केट येथील सिमेंट काँक्रीट रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या ९ अनधिकृत दुकानावर बुधवारी दुपारी सहायक आयुक्त अजित गोवारी यांच्या नेतृत्वाखाली कडक पोलीस बंदोबस्तात पाडकाम कारवाई करण्यात आली. तर कॅम्प नं-५ येथील स्वामी शांतीप्रकाश शाळेकडे जाणाऱ्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या ३१ अनधिकृत दुकानावर पाडकाम कारवाई करण्यात आली.
पाडकाम कारवाई दरम्यान कोणतीही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सहायक आयुक्त व अतिक्रमण विभाग प्रमुख गणेश शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली पाडकाम कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत दुकानदारांचे धाबे दणाणले आहे. शहरात महापालिकेचे बनावट बांधकाम परवाना नामफलक लावून सर्रासपणे अवैध आरसीसी बांधकामे सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. अश्या नामफलक लावलेल्या बांधकामाची चौकशी प्रभाग समिती निहाय करण्याच्या मागणीने जोर पकडला असून मोठा घोटाळा उघड होणार असल्याचेही बोलले जात आहे.
शहरातील अवैध बांधकामावर अंकुश ठेवण्यासाठी महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, संबंधित उपायुक्त व प्रभाग अधिकारी यांनी आठवड्याला आढावा घेतल्यास, अवैध बांधकामधारक, भूमाफिया, महापालिका अधिकारी यांच्यासह संबंधितांचे पितळ उघडे पडणार असल्याचे बोलले जात आहे . सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या मार्गदर्शनामुळे बुधवारची अवैध दुकानावरील कारवाई यशस्वीपणे पार पडली. इतर रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या अवैध बांधकामावर पाडकाम कारवाईचे संकेत शिंपी यांनी यावेळी दिले आहे.